Join us

कोरोना रुग्ण संख्येत घट; सक्रिय रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:09 IST

मुंबई - मागील काही दिवस मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ दिसून आली. मात्र, शनिवारी दिवसभरात ३६५ रुग्ण आढळून आल्याने ...

मुंबई - मागील काही दिवस मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ दिसून आली. मात्र, शनिवारी दिवसभरात ३६५ रुग्ण आढळून आल्याने दिलासा मिळाला. मात्र, चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला असून ताे पाच हजाराच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे रुग्ण वाढीचा सरासरी दैनंदिन दर आता ०.०६ टक्के एवढा आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही ११८५ दिवसांवर आला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख ३४ हजार ७०२ रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी २३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण सात लाख ११ हजार ५५४ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार ६६६ एवढी आहे. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण सहव्याधी होत्या.

मृतांमध्ये एक पुरुष, तर तीन महिला रुग्णांचा समावेश होता. यापैकी मृत झालेला प्रत्येकी एक रुग्ण ४० वर्षांखालील व ४० ते ६० वर्षांमधील होता, तर दोन मृत ६० वर्षांवरील होते. दिवसभरात ३५ हजार ८५१ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ९६ लाख ८६ हजार २५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.