मनोहर कुंभेजकर, मुंबई: गोरेगाव पूर्व येथील चित्रनगरीच्या जागेतील आदिवासी पाडयांचे पुनर्वसन करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा करावी. सर्व मुलभूत सोई-सुविधा देऊन उपजीविकेच्या साधानासाहित त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी सुचना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत दिली. चित्रानगरीतील अनधिकृत गोदामे काढून टाकण्यात यावीत, शाळेच्या बसेस चित्रनगरीतून जाण्याची मुभा दयावी, वनराई पोलीस स्टेशन येथील रस्ता खुला करावा, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य दयावे, अशा सूचनाही खासदार वायकर यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या. त्याही त्यांनी मान्य केल्या.
चित्रनगरीच्या अखत्यारीत असलेल्या जागे मध्ये नुकतीच आग लागली होती, त्या पार्श्वभूमीवर खासदार वायकर यांनी सोमवारी चित्रनगरीत बैठक घेतली. या बैठकीला व्यवस्थापकीय संचालकी स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावलकर, आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिपूरकर, नायब तहसीलदार किरण आम्बुर्ली, भूमापक आर.जे.ठाकुर, पी दक्षिण मनपा विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव, अग्निशमन दलाचे अधिकारी सोमनाथ जायभाय, वनपाल आर.पी.पाटोळे, माजी नगरसेविका रेखा रामवंशी, शाखा प्रमुख बाळकृष्ण जोशी, राजन राणे, पूजा शिंदे, सुरेखा गुटे, हिनल पंड्या, रेणू यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
चित्रनगरीत लागणाऱ्या आगीच्या घटना लक्षात घेता फायर टेंडर अपलोड करण्यात आले आहे. चित्रनगरीतील अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी स्वतःची अग्निशमन यंत्रणा उभारणार असून एका फायर अधिकाऱ्याची नेमणूक ही करणार असल्याची माहिती म्हसे पाटील यांनी यावेळी दिली. चित्रनगरीने स्वतःच्या जागेत अधिक अतिक्रमण करण्यात येऊ नये यासाठी जागेचे सर्वेक्षण करून जागे सभोवताली कुंपण घालण्याच्या सूचना खासदार वायकर यांनी दिल्या. अशा प्रकारे सर्वेक्षणाचे काम तात्काळ सुरु करण्यात येईल असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालकांनी यांनी यावेळी दिले.
चित्रनगरीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत असून टप्प्यात टप्प्याने त्याचा विकास करण्यात येणार असून पीपीपी अथवा स्वयम विकासाच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे. तसेच आझादीका अमृत फंड निधीच्या माध्यमातून सध्या चित्रनगरीतील स्टुडिओचे नूतनीकरणाचे काम सुरु असल्याची माहिती ही म्हसे पाटील यांनी दिली.