Join us

गुंतवणुकीवर नफ्याचे आमिष दाखवत फसवले; बँक कर्मचाऱ्याला लाखोंचा लावला चुना

By गौरी टेंबकर | Updated: March 30, 2024 18:11 IST

तक्रारदार कोमलगिरी राम (३१) हे एसबीआय बँकेत नोकरी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार ते त्यांच्या एसबीआय कॉटर्स येथील घरात असताना त्यांना गुगलवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता सर्च करत होते.

मुंबई: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावर त्यात पंधरा ते वीस टक्के नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका बँक कर्मचाऱ्याला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला. याप्रकरणी त्यांनी ओशिवरा पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार कोमलगिरी राम (३१) हे एसबीआय बँकेत नोकरी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार ते त्यांच्या एसबीआय कॉटर्स येथील घरात असताना त्यांना गुगलवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता सर्च करत होते. त्यादरम्यान त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअप मेसेज प्राप्त झाला. त्यामध्ये शेअर मार्केटच्या गुंतवणुकीवर १५ ते २० टक्के प्रॉफिट कमवू शकता असे नमूद करण्यात आले होते. ज्यामध्ये मोठमोठ्या कंपनीची नावे देखील नमूद असल्याने राम यांना त्यावर विश्वास बसला. त्यांनी संबंधितांना गुंतवणूक करण्यासाठी होकार दिला आणि २८ जानेवारी, २०२४ ते १३ फेब्रुवारी पर्यंत त्यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली ९.६१ लाख रुपये भरले आहेत.

राम ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत होते त्या कंपनीचा आयपीओ लिस्ट झाला तेव्हा त्यांनी त्यांचे पैसे आणि नफ्याची मागणी केली. तेव्हा भामट्यांनी त्यांना अजून ३२ लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. राम यांनी पैसे परत मागितले आणि बरीच विनंती केली तरी त्यांना ती रक्कम देण्यात आली नाही. तसेच समोरून प्रतिसाद देणेही बंद झाले तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ओशिवरा पोलिसात धाव घेतली.