Join us

अनधिकृत बांधकामांचे डेब्रिज बोरीवलीकरांच्या माथी

By admin | Updated: July 1, 2014 01:04 IST

अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठीच कशी धडपड करतात, याचा अनुभव बोरीवलीतील राजेंद्रनगरातील रहिवासी घेत आहेत.

मुंबई : अनधिकृत बांधकामांमधून निघणारे डेब्रिज सार्वजनिक ठिकाणी फेकण्यात येत असताना महापालिका अधिकारी त्याबाबत दंडात्मक कारवाई करण्याऐवजी ते अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठीच कशी धडपड करतात, याचा अनुभव बोरीवलीतील राजेंद्रनगरातील रहिवासी घेत आहेत. 
रातोरात अनधिकृत बांधकाम करून डेब्रिज रस्त्यालगत कुठेही फेकण्याचे प्रकार या भागात नेहमीच घडत असतात. या बांधकामांना पालिका अधिका:यांचा वरदहस्त असल्याने याबाबत कारवाई करण्यात येत नाही. गेल्या आठवडय़ात राजेंद्रनगर येथे अनधिकृत बांधकाम करून त्यातून निघणारे डेब्रिज 50—60 गोण्यांमध्ये भरून रात्रीच्या वेळी राजेंद्रनगरातील मैदानात फेकण्यात आले. हा प्रकार निदर्शनास येताच रहिवाशांनी महापालिकेच्या आर मध्य विभागाचे विभाग कार्यकारी अभियंता सतीश गोणो यांच्याकडे सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आलेले डेब्रिज उचलण्याबाबत कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर या अनधिकृत बांधकामाला स्टॉपवर्क नोटीस देण्यात आल्याचे गोणो यांनी सांगितले. रहिवाशांनी आपली तक्रार केवळ मैदानात टाकण्यात आलेल्या डेब्रिजबद्दल असल्याचे स्पष्ट केले. मात्र गोणो यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर या अनधिकृत बांधकामाचा वेग तर वाढलाच, मात्र डेब्रिजबाबत काहीच कारवाई करण्यात आली नाही.
रहिवाशांनी गोणो यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यालयातील हेमलता वाडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही लवकरच मुकादमाला पाठवून डेब्रिज उचलण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर अद्याप त्या बांधकामाला स्टॉपवर्क नोटीस दिली नसून तोंडी समज देण्यात आली आहे. लवकरच ती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितल्याने गोणो यांनी आपणास खोटी माहिती का दिली, असा प्रश्न रहिवाशांना पडला.  
रहिवासी डेब्रिजचा पाठपुरावा घेत असताना महापालिका अधिकारी केवळ मुकादमाला घटनास्थळी पाठवण्यात आल्याचेच वारंवार सांगत होते. त्यामुळे हे अधिकारी केवळ मुकादमावरच विसंबून सारे निर्णय घेतात की मुकादमच या विभागाचा सारा कारभार चालवतो, असे प्रश्न रहिवाशांना पडले आहेत. 
रहिवासी डेब्रिजची तक्रार करीत असताना त्याबाबत कारवाई करण्याऐवजी अनधिकृत बांधकाम घाईघाईने पूर्ण करू देणा:या अकार्यक्षम अधिका:यांवर महापालिका काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)