Join us
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डेब्रिज माफिया पुन्हा सक्रीय

By admin | Updated: November 3, 2014 00:42 IST

शहरात डेब्रिज माफियांच्या कारवाया वाढल्या आहेत. महापालिकेच्या भरारी पथकांची नजर चुकवून शहरातील मोकळी मैदाने आणि खाडी किनाऱ्यावर सर्रास डेब्रिज टाकले जात आहेत.

नवी मुंबई : शहरात डेब्रिज माफियांच्या कारवाया वाढल्या आहेत. महापालिकेच्या भरारी पथकांची नजर चुकवून शहरातील मोकळी मैदाने आणि खाडी किनाऱ्यावर सर्रास डेब्रिज टाकले जात आहेत. विशेषत: जुहूगाव परिसरातील खाडी किनाऱ्यावर मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आल्याने येथील जैव विवधेता धोक्यात आली आहे. डेब्रिज माफियांनी शहरातील खाडी किनारे आणि निर्जन स्थळांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. वाशी, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली या भागातील खाडी किनाऱ्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. घणसोली येथील पामबीच मार्गालगतच्या खारफुटीवर रात्रीच्यावेळी डेब्रिज टाकण्याचे काम केले जात आहे. या रस्त्यावरून जाताना टप्या टप्याने खारफुटीवर डेब्रिजचे ढीग दिसून येत आहेत. विशेष म्हणजे डेब्रिज माफियांच्या या कारवायांना आळा घालण्यास महापालिकेच्या भरारी पथकाला सपशेल अपयश आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर डेब्रिजमुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)