Join us
Daily Top 2Weekly Top 5

टोलविरोधी आंदोलनावरून काँग्रेस-शेकापमध्ये वाद

By admin | Updated: July 7, 2014 01:46 IST

सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्यावरून काँग्रेस आणि शेकापमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्यावरून काँग्रेस आणि शेकापमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या टोलविरोधात काँग्रेसने राबविलेल्या सह्यांच्या मोहिमेत शेकापकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात केली आहे. खारघर येथील प्रस्तावित टोल नाक्यावरून राजकारण तापले आहे. या टोलच्या विरोधात सर्वपक्षीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात भाजपाचे नेते आमदार विनोद तावडे यांनी या टोलनाक्याला भेट देवून आंदोलन केले. सदर टोल रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. भाजपाबरोबरच काँग्रेस आणि शेकापनेही त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र टोलच्या विरोधात उभारलेल्या या आंदोलनात आता कुरघोडी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या वतीने सुकापूर येथे सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत काँग्रेसचे संकेत भगत आणि शेकापचे राजेश केणी यांच्यात वादावादी झाली. हे प्रकरण इतक्यावरच न थांबता आता ते थेट पोलिस ठाण्यापर्यंत जावून पोहचले आहे. (प्रतिनिधी)