Join us  

दहिसर-अंधेरी या मेट्रो-७च्या कामादरम्यान कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 2:13 AM

शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गोरेगावमधील वनराई येथे दहिसर-अंधेरी या मेट्रो-७च्या पिअर कॅपचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात हरिओम यादव (२१) या कामगाराचा मृत्यू झाला.

मुंबई : शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गोरेगावमधील वनराई येथे दहिसर-अंधेरी या मेट्रो-७च्या पिअर कॅपचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात हरिओम यादव (२१) या कामगाराचा मृत्यू झाला.शनिवारी पहाटे दहिसर-अंधेरी या मेट्रो-७च्या पिअर कॅपचे काम सुरू होते. या वेळी तांत्रिक अडथळे निर्माण झाले. क्रेनचे रिअर राईट आऊटगिअर खेचताना म्हणजेच क्रेनची दिशा ठरविताना तांत्रिक बिघाड झाला. रिअर अचानक खेचला गेला आणि तो हरिओम यादव यांच्या डोक्याला लागला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जनरल कन्सल्टंट आणि संबंधित एजन्सीला या अपघाताच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. शिवाय या प्रकरणी तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व क्रेन आॅपरेटर्सना पुन्हा प्रशिक्षण देण्याचे निर्देशही प्राधिकरणाने दिले आहेत. या दुर्दैवी अपघातात मृत झालेल्या हरिओम यादव यांच्या कुटुंबाला नियमानुसार देण्यात येणारी नुकसानभरपाई एजन्सीद्वारे दिली जाणार आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.चालकाचे मदतनीसक्रेनच्या ‘आऊट रिअर’मध्ये डोके चिरडले गेल्याने हरिओम यादवचा मृत्यू झाला. यादव मूळचे उत्तर प्रदेशचे असून, मुंबईत अंधेरीमध्ये वास्तव्यास होते. क्रेनवर यादव हे चालकाचा मदतनीस म्हणून काम पाहात होते. दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, असे वनराई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम यांनी सांगितले.

टॅग्स :मेट्रो