Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुसरीतल्या विद्यार्थ्याचा खेळताना मृत्यू

By admin | Updated: January 7, 2015 01:36 IST

बास्केट बॉल स्पर्धेत खेळता खेळता दुसरीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना माटुंग्यातील डॉन बॉस्को शाळेत सकाळी अकराच्या सुमारास घडली.

मुंबई : बास्केट बॉल स्पर्धेत खेळता खेळता दुसरीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना माटुंग्यातील डॉन बॉस्को शाळेत सकाळी अकराच्या सुमारास घडली. केनेथ जोसेफ शॉन रोझारीओ (वय ७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेत सुरू असलेल्या बास्केट बॉल स्पर्धेत केनेथने भाग घेतला होता. शिक्षक आणि अन्य विद्यार्थ्यांची स्पर्धेनिमित्त गर्दी होती. ठरावीक अंतरावरून बॉल बास्केटमध्ये टाकणे, असे स्पर्धेचे स्वरूप होते. केनेथनेही बॉल बास्केटमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि अचानक भोवळ येऊन खाली पडला. शिक्षक आणि शाळा कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला जवळच्या खासगी डॉक्टरकडे उपचारार्थ नेले, मात्र तोवर उशीर झाला होता. या डॉक्टरने पुढे केनेथला सरकारी रुग्णालयात हलविण्यास सांगितले. तेथे त्याला मृत घोषित केले गेले. दुपारी बाराच्या सुमारास ही माहिती माटुंगा पोलिसांना मिळाली.दीड वर्षाचा असल्यापासून केनेथला फिट किंवा आकडीचा त्रास होता, अशी माहिती माटुंगा पोलिसांना मिळाल्याचे समजते. तूर्तास पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे. तसेच केनेथचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. (प्रतिनिधी)केनेथचे वडील शॉल मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता असून, सध्या ते जहाजावर आहेत. मार्चमध्ये सुटी मिळताच ते मुंबईत कुटुंबाकडे परतणार होते. या घटनेची माहिती मेलद्वारे त्यांना कळविण्यात आल्याचे समजते.