Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील महिलेचा स्वाइनमुळे मृत्यू

By admin | Updated: February 15, 2015 01:02 IST

मुंबईत शनिवारी स्वाइन फ्लूचे ७ रुग्ण आढळले असून, मुंबईबाहेरून मुंबईत उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : मुंबईत शनिवारी स्वाइन फ्लूचे ७ रुग्ण आढळले असून, मुंबईबाहेरून मुंबईत उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यभरातील एकूण मृत्यांची संख्या ६ झाली आहे. त्यामध्ये लातूरमधील दोन महिला व पुणे आणि नागपूर प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सध्या मुंबईतील स्वाइनच्या रुग्णांची संख्या ८० असून, मुंबईबाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या ३८ इतकी आहे. ठाण्याच्या ३० वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या आठवर गेली आहे.३१ जानेवारीपासून ठाणे परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेत स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून येत होती. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या महिलेला त्रास जाणवू लागल्याने तिला प्लॅटिनम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिची प्रकृती खालावल्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी तिला सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवले. उपचार सुरू असतानाच तिला न्यूमोनियाची लागण झाली. त्यातच तिची प्रकृती खालावल्याने शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर प्रदेश येथून ४७ वर्षीय पुरुषास स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे उपचारासाठी कस्तूरबा रुग्णालयात दाखल केले आहे. तर गुजरातमधील ३२ वर्षीय महिलेला स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी अंबानी रुग्णालयात दाखल केले आहे. मुंबईत शनिवारी आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ५ आणि १७ वर्षांची दोन मुले आहेत. अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या ५ वर्षीय मुलाला स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्याच्यावर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. चर्नी रोड येथील १७ वर्षीय मुलावरही बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. दादरच्या ५५ वर्षीय महिलेला, जुहूच्या ३६ वर्षीय महिलेला, माहीम आणि कुर्ल्याच्या ५६ वर्षीय पुरुषास आणि पवईच्या ३३ वर्षीय पुरुषास स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. सर्व रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)पुण्यात लागण झालेल्या ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर शनिवारी स्वाइन फ्लूची लागण झालेले १२ नवे रुग्ण सापडले आहेत. लातूरमध्ये चार, तर पुण्यात अवघ्या दीड महिन्यात बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे.