Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत उपचार न मिळाल्याने माता-बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखोडाळा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसरातील अतिदुर्गम आमले येथील मनीषा सन्या दोरे (२५) या गरोदर आदिवासी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोडाळा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसरातील अतिदुर्गम आमले येथील मनीषा सन्या दोरे (२५) या गरोदर आदिवासी महिलेस प्रसूतीच्या वेदनाकाळात रुग्णवाहिका आणि उपचार वेळेत मिळाले नाहीत. या महिलेचे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात १७ नोव्हेंबरला सिझरिंग करण्यात आले. मात्र, त्याच रात्री बाळाचा मृत्यू झाला आणि महिला अत्यवस्थ झाली. या महिलेवर उपचार सुरू असताना तिचाही गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मृत्यू झाला.

अतिदुर्गम आमले येथील मनीषा सन्या दोरे (२५) या सात महिन्यांच्या गरोदर आदिवासी महिलेला अचानक रक्तस्राव आणि प्रसूतिवेदना मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास होऊ लागल्या. या वेळी येथील आशा कार्यकर्ती मंगला वारे हिने १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका अडीच तासांंनंतर गावाच्या वेशीवर पोहोचली. दरम्यानच्या काळात येथील ग्रामस्थांनी या महिलेस डोली करून तीन किलोमीटर पायपीट करत खोडाळा-वाडा या मुख्य रस्त्यावर आणले. या अडीच तासांत महिलेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव आणि पाणी बाहेर पडले.

अशा अवस्थेतच तिची खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून पुढील उपचारासाठी तिला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याच रात्री तिचे सिझरिंग करण्यात आले. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, त्याच रात्री त्या बाळाचा मृत्यू झाला आणि मनीषाही अत्यवस्थ झाली. तिच्यावर उपचार सुरू असतानाच मनीषाचा गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.

कोट

या महिलेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर ड्युटीवर असलेल्या डाॅक्टरांनी प्रथमोपचार केले. तिचा रक्तदाब कमी झाल्याने तसेच रक्तस्राव होत असल्याने तिला तातडीने नाशिकला हलविण्यात आले. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली १०८ रुग्णवाहिका कोविड सेंटरला दिली आहे. आम्ही १०८ ची अनेकदा मागणी केली आहे.

- डाॅ. सागर मुकणे,

वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडाळा