Join us

मुंबईतील जवानाला वीर मरण

By admin | Updated: February 5, 2015 02:22 IST

कर्त्या मुलाच्या विवाहाची तयारी धावपळ सुरू असताना बोहल्यावर चढण्याआधीच त्याच्या वीर मरणाचे दु:ख कांजुरमार्गाच्या एका कुटुंबावर कोसळले आहे़

मुंबई : कर्त्या मुलाच्या विवाहाची तयारी धावपळ सुरू असताना बोहल्यावर चढण्याआधीच त्याच्या वीर मरणाचे दु:ख कांजुरमार्गाच्या एका कुटुंबावर कोसळले आहे़ महेश गोरखनाथ ढवळे (२५) असे शहिद झालेल्या जवानाचे नाव आहे़ महेश हा भारतीय शांती सेनेत कार्यरत होता़ तो साऊथ सुदान येथे कर्तव्य बजावत असताना त्याला वीर मरण आले़ महेशच्या विवाहाची तयारी सुरू असताना कांकाना तो शहिद झाल्याचा फोन आला़ या वृत्ताने ढवळे कुटुंब सुन्न झाले़ या वृत्ताची शहानिशा करण्यासाठी या कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाणे गाठले़ पण तेथेही या वृत्ताचा काहीच तपशील नव्हता़ अखेर त्यांनी सुरक्षा दलाशी संपर्क साधला़ तेथे महेश गेल्याचे वृत्त खरे असल्याचे मिळाले आणि गोंधळालाही सुन्न करणारा एक हंबरडा फुटला़़़मुळचा पुणे येथील जुन्नर तालुक्यातील महेश गोरखनाथ ढवळेचा जन्म मालाड मध्ये झाला. आई, वडील, दोन बहीणी व एक भाऊ यांंच्यासोबत तो मालाड येथे राहत होता़ रस्तारुंदिकरणामध्ये त्यांना मालाड येथील घर सोडून कांजुरमार्गला यावे लागले. ढवळे कुटुंबिय कांजुर येथील एमएमआरडीएच्या न्यू.आम्रपाली को. आॅप. हौसिंग सोसायटीमध्ये राहण्यास आहे़ घरातील कर्ता मुलगा म्हणून महेशवर घरची जबाबदारी होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सैन्यात भरती होण्याची संधी त्याला मिळाली. आणि १४ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गेल्या साडे सहा वर्षापासून तो साऊथ सुदान येथील भारतीय शांती सेनेत सैनिक म्हणून कार्यरत होता. तीन महिन्यापूर्वी काही दिवसांसाठी सुट्टीवर आलेल्या महेशला घरच्यांनी त्याला लग्नाचा घाट घातला. साखरपुडा उरकुन येत्या २५ मार्चला त्याच्या लग्नाची तारीख ठरली होती. लग्नासाठी २० तारखेपासून सुट्टीही टाकण्यात आली. लग्नासाठी महेश घरी येणार याच्या प्रतिक्षेत असलेल्या त्याच्या घरच्यांवर सध्या महेशचा मृतदेहासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याची दूर्दैवी वेळ ओढावली आहे. लग्नाच्या गप्पा अखेरच्या ठरल्या...महेश सेनेत भरती झाल्यापासून आम्ही रोज व्हॉट्स अप आणि मेसेज द्वारे एकमेकांंच्या जवळ असायचो. अशात विवाह ठरल्यापासून दोघांमध्ये खरेदीच्या गप्पा रात्र रात्रभर रंगत होत्या. १ तारखेच्या रात्री घरच्यांंची काळजी त्यात लग्नाच्या खरेदिबाबतच्या गप्पा अखेरच्या ठरतील असे स्वप्नात सुद्धा वाटले नसल्याचे महेशचा भाऊ विश्वनाथ याने सांगितले.