नवी मुंबई : सुटे पैसे देण्यावरून झालेल्या वादामध्ये फळ विक्रेत्याने केलेल्या मारहाणीत वृध्दाच्या मृत्यूची दुर्देवी घटना नेरूळ येथे शनिवारी घडली. या प्रकरणी फरार फळ विक्रेत्याचा पोलिस शोध घेत आहेत. नेरूळ सेक्टर २० येथे शनिवारी शेखर पाटील (५३) यांनी त्याच परिसरातील फळ विक्रेत्याकडून काही फळे खरेदी केली. यावेळी त्यांनी सदर फळ विक्रेत्याला एक हजार रुपयांची नोट दिली. परंतु हातगाडीवर फळे विकणाऱ्या या फेरीवाल्याने आपल्याकडे सुटे पैसे नसल्याचे सांगत पाटील यांच्याकडे सुट्या पैशांची मागणी केली. यावेळी सुट्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्याने फळ विक्रेत्याने त्याच्या साथीदारासह पाटील यांना मारहाण केली. या प्रकारात पाटील हे रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले असताना एका रिक्षा चालकाने त्यांना रुग्णालयात नेले. परंतु बाह्य अंगावर कोणतीही जखम नसल्याने पाटील रुग्णालयात दाखल न होता घरी गेले. अखेर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्यांना उलट्या होऊ लागल्याने सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाणीमध्ये पडल्याने पाटील यांच्या डोक्यात जखम झाल्याचे पोलीस निरीक्षक नागराज मजगे यांनी सांगितले. फळ विक्रेत्याविरोधात नेरूळ पोलीसांत गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
फळ विक्रेत्याच्या मारहाणीत वृध्दाचा मृत्यू
By admin | Updated: February 23, 2015 01:00 IST