Join us

दहीहंडी पाहायला गेलेल्याचा मृत्यू

By admin | Updated: September 8, 2015 01:49 IST

रविवारी दहीहंडी उत्सव पाहायला बाहेर पडलेल्या एका २२वर्षीय तरुणाचा बाईक अपघातात मृत्यू झाला. उपचारासाठी त्या तरुणाला केईएम रुग्णालयात रविवारी रात्री दाखल करण्यात आले होते.

मुंबई : रविवारी दहीहंडी उत्सव पाहायला बाहेर पडलेल्या एका २२वर्षीय तरुणाचा बाईक अपघातात मृत्यू झाला. उपचारासाठी त्या तरुणाला केईएम रुग्णालयात रविवारी रात्री दाखल करण्यात आले होते. रात्री १०.३५ ला उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला. मालाड येथे राहणारा शर्विन तळाशीकर (२२) हा तरुण उत्सव पाहण्यासाठी बाईकवरून परळ परिसरात येत होता. बाईकच्या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. तत्काळ त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा त्याचा अपघात झाला होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दहीहंडीच्या दिवशी एकूण ३२२ गोविंदा जखमी झाले. यापैकी २९७ गोविंदा किरकोळ जखमी झाले होते. या गोविंदाना हाताला, पायाला मार, जखम, मुका मार लागला होता. या गोविंदांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. पण, २५ गोविंदांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काही जणांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) डिहायड्रेशनचा त्रास १४वर्षीय केविन हा सातव्या थरावरून पडला. बाजूने पाणी मारले जात होते त्यातच उन्हाळा असल्यामुळे त्याला जास्त त्रास झाला. डिहायड्रेशन झाल्यामुळे त्याला उलट्या होऊ लागला. त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी त्याची प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गेल्या ४ वर्षांपासून तो दहीहंडीत सहभागी होऊन वरच्या थरावर चढतो. पण, पुढच्या वर्षी थरावर चढणार नाही, असे केविनने सांगितले. - लहानपणापासून दहीहंडीत सहभागी होणारा अमित जाधव दुसऱ्या थरावरून पडला. त्याच्या पोटाला मार बसला आहे. यामुळे दोन दिवस तो काहीच खाऊ शकत नाही. त्याला सलाईन आणि आॅक्सिजन लावण्यात आला आहे. - लालबागला राहणारा २०वर्षीय नरेंद्र गावडे थर उतरताना पडला व त्याच्या डोक्याला मार लागला. त्याचा सीटी स्कॅन नार्मल असला तरीही त्याला मधेच चक्कर आल्यासारखे होते. म्हणून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.