Join us

डीसी-एसी परिवर्तनाला मिळाला निधी

By admin | Updated: February 29, 2016 03:40 IST

मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) परिवर्तन पूर्ण करण्यात आल्यानंतर, आता हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील परिवर्तन

मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) परिवर्तन पूर्ण करण्यात आल्यानंतर, आता हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील परिवर्तन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कामासाठी रेल्वे अर्थसंकल्पातून १0 कोटींपेक्षा जास्त निधी मिळाल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. पश्चिम रेल्वे मार्गावर डीसी ते एसी परिवर्तन पूर्ण झाल्यानंतर, मेन लाइनवरील संपूर्ण मार्गावर हे परिवर्तन काही महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. आता यानंतर हार्बर आणि ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर परिवर्तन पूर्ण केले जाणार आहे. तत्पूर्वी, मध्य रेल्वेच्या हार्बरवरील बारा डबा प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. हार्बरवर मार्च २0१६ पर्यंत डीसी ते एसी परिवर्तन पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर एसी परिवर्तनाच्या म्हणजेच, सिमेन्स कंपनीच्या नव्या लोकल धावणे शक्य होईल. या कामानंतर डिसेंबर २0१६ पर्यंत ट्रान्स हार्बरवर परिवर्तनाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या दोन्ही कामांसाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात १0 कोटी ३२ लाख ४६ हजार रुपये निधी मिळाल आहे. २0१५-१६ मध्ये ११ कोटी १0 लाख रुपये निधी मिळाला होता. हा निधी मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील परिवर्तनासाठी वापरतानाच हार्बरवरील परिवर्तनाच्या किरकोळ कामांसाठीही वापरला गेला. आता मिळालेल्या निधीतून प्रथम हार्बरवरील एसी परिवर्तनाचे काम पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले.