इक्बालची चौकशी : अनेक तक्रारदार पुढे येण्याची शक्यता?मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ म्हणून ओळख असलेल्या इक्बालच्या चौकशीतून पोलिसांना दाऊदच्या भारतातल्या हालचाली, गुन्हे आणि काळ्या पैशांच्या गुंतवणुकीबाबत महत्वाची माहिती मिळू शकते. फक्त ही माहिती मिळाल्यानंतर कारवाईची इच्छाशक्ती असल्यास शहरातून डी कंपनीशी संबंधीत अनेक जण गजाआड होऊ शकतात, अशी चर्चा आहे.दाऊदचे वलय मिळाल्याने इक्बाल आणि त्याच्या साथीदारांनी गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण मुंबईसह मुस्लिम बहुल भागांत दहशत निर्माण केल्याची माहिती मिळते. दोघांत समेट घडवून आणणे, मालमत्तेसाठी धमक्या, मारहाण अशाप्रकारे इक्बाल व त्याच्या साथीदारांनी दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांना हैराण केल्याचेही बोलले जाते. मात्र इक्बाल दाऊदचा भाऊ आहे यामुळे या छळाच्या, गुन्ह्यांच्या तक्रारी आजवर पुढे आलेल्या नाहीत. मात्र आता इस्टेट एजंट सलीम शेख याच्या तक्रारीनंतर जेजे मार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे या परिसरातून इक्बालविरोधात तक्रारी पुढे येण्याची दाट शक्यताही व्यक्त होत आहे.सूत्रांनुसार बोहरा समाजाच्या सैफी बुऱ्हाणी ट्रस्टतर्फे २००९पासून भेंडीबाजारचा क्लस्टर डेव्हलपमेन्टच्या माध्यमातून विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमध्ये इक्बाल महत्त्वाचा अडसर होता, अशीही चर्चा दबक्या आवाजात भेंडी बाजारातून ऐकू येते. गेल्या दोन अडीज दशकांपासून कराचीत बसून दाऊदने मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दरारा राखला. तस्करी, बॉलीवूड, रियल इस्टेट, हत्येची सुपारी, अंमलीपदार्थ या आणि अशा अनेक वैध-अवैध धंद्यांमध्ये त्याने दहशत निर्माण केली. कालांतराने आजच्या घडीला पाकिस्तान आणि भारतासह मध्यपुर्वेतल्या देशांमध्ये दाऊदने मोठया प्रमाणावर रियल इस्टेट आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पैसा गुंतवल्याचे बोलले जाते. या गुंतवणुकीची माहिती मुंबई पोलिसांना इक्बालच्या माध्यमातून काही प्रमाणात मिळू शकते, असेही बोलले जाते. (प्रतिनिधी)दाऊदचा भाऊ आणि तीन लाख : इक्बालने इस्टेट एजंट महोम्मद अब्दुल सलीम अब्दुल जब्बार शेख(४८) या भेंडीबाजार, नागपाड्यातील इस्टेट एजंटकडून तीन लाखांची खंडणी मागितली, त्याला घरी बोलावून मारहाण केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दाऊदच्या हालचालींची मिळणार माहिती ?
By admin | Updated: February 4, 2015 02:46 IST