Join us  

डी.एन. नगरची कन्या लष्करात झाली दाखल, फ्लाइट लेफ्टनंट पदावर नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 2:54 AM

श्रद्धा डी. एन. नगरमध्ये लहानाची मोठी झाली. सध्या ती अंधेरी पश्चिम, आझाद नगर येथे राहते.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : देशसेवा करायची आहे हे स्वप्न उराशी बाळगून श्रद्धा विलास शिवडावकर ही येत्या २७ मार्चपासून लष्करात फ्लाइट लेफ्टनंट या पदावर रुजू होणार आहे.  ७ मार्च रोजी तिला भारतीय सैन्यदलात फ्लाईट लेफ्टनंट पदाच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र मिळाल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला असे, तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. आमच्या घरात कोणीही लष्करात नाही. तिने स्वत: लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे ठरवले होते, अशी माहिती त्यांनी दिली.घरात तिचे आईवडील, भाऊ सागर, आजी लक्ष्मी, आजोबा शांताराम असे कुटुंब राहतात. कणकवली तालुक्यातील करूड-फोफेवाडी या तिच्या गावातही या कोकण कन्येने मिळवलेल्या या घवघवीत यशाबाबत तिचे कोकणात कौतुक होत आहे.श्रद्धाचे वडील विलास शिवडावकर हे मंत्रालयात अधिकारी पदावर असताना त्यांनी सेवानिवृत्ती घेतली, तर आई सुप्रियानेही मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्ती घेतली आहे. अंधेरी पश्चिम डी.एन. नगर येथील इमारत क्रमांक ९ मध्ये लहानाची मोठी झालेल्या श्रद्धाने आमच्या डी.एन. नगरचे नाव रोशन केल्याचे भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच गुणीजनांचा गौरव करतात. तसा गौरव त्यांच्या हस्ते श्रद्धाचा झाला पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.श्रद्धा डी. एन. नगरमध्ये लहानाची मोठी झाली. सध्या ती अंधेरी पश्चिम, आझाद नगर येथे राहते. १९९५ साली जन्मलेल्या श्रद्धाचे १० वीपर्यंतचे येथील अंधेरी पश्चिम येथील सी.डी. बर्फीवाला हायस्कूलमध्ये झाले. लहानपणापासून हुशार असलेल्या श्रद्धाला १० वीत ९३ टक्के, तर बारावीत ८९ टक्के मार्क मिळाले. इयत्ता ११वी व १२वी गोरेगावच्या पाटकरमध्ये केल्यानंतर माटुंगा येथील रूपारेल कॉलेजमध्ये तिने बीएससी आयटीची पदवी घेतली. लष्करात जाऊन देशाची सेवा करायची हे स्वप्न बाळगून तिने रूपारेल कॉलेजमध्ये असताना एनसीसीत प्रवेश घेऊन त्यात सी ग्रेड मिळविली. त्यानंतर, आर्मी व एअर फोर्समध्ये अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी एसएसबी व एनसीसी कॅडेट म्हणून तिने सात वेळा प्रयत्न केले. सहा वेळा भरतीप्रक्रिया यशस्वी झाली, परंतु ती मेरिटमध्ये आली नाही. पण तिने जिद्द सोडली नाही आणि सातव्या वेळी एनसीसी ग्रुपमधून पहिल्या नंबरने यशस्वी झाली, असे तिचे वडील विलास व आई सुप्रिया यांनी अभिमानाने सांगितले.चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण संस्था येथे गेल्या १९ एप्रिल ते ७ मार्च, २० या काळात तिने खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. आता तिला २७ मार्च रोजी फ्लाइट लेफ्टनंट या पदावर पंजाबच्या जालंदर येथे नियुक्ती मिळाली आहे.‘अकरा महिने घेतले खडतर प्रशिक्षण’चेन्नई येथील अत्यंत खडतर प्रशिक्षणाबाबत श्रद्धाने सांगितले की, येथील प्रशिक्षण अत्यंत खडतर असून, तावून सुलाखून येथून ट्रेनी बाहेर येतात. ११ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी, लष्कराची शिस्त अंगीकारत कठीण काळात कसा तग धरावा, हे आम्हाला शिकविले. यात परेड, ड्रील, धावणे, वजन घेऊन धावणे हे सर्व असते. ज्यांना देशसेवा करायची आहे, त्यांना ्नङ्म्रल्ल्रल्ल्िरंल्लं१े८.ल्ल्रू.्रल्ल या वेबसाइटवर सर्व माहिती उपलब्ध आहे. दर सहा महिन्यांनी परीक्षा असते, अशी माहिती तिने दिली.

टॅग्स :भारतीय जवानमुंबई