Join us
Daily Top 2Weekly Top 5

दत्तू भोकनाळच्या पत्नीने बाजू मांडण्यासाठी मागितला वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 02:36 IST

हिंसाचार, फसवणूक प्रकरण; उच्च न्यायालयातील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब

मुंबई : भारताचा रोर्इंगपटू दत्तू भोकनाळ याच्या पत्नीने आपली बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयाकडे वेळ मागितली आहे. हिंसाचार व फसवणुकीचा गुन्हा तिने भोकनाळविरोधात नोंदविला आहे. तो रद्द करण्यात यावा, यासाठी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी आता शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली.

२०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेला दत्तू भोकनाळ हा भारताचा एकमेव रोइंगपटू होता. तसेच २०१८ च्या आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये त्याने रोइंगमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. पुढील महिन्यात आॅस्ट्रियामध्ये ‘वर्ल्ड रोइंग चॅम्पियनशिप’ खेळण्यासाठी तो जाणार आहे. तत्पूर्वी त्याच्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द झााला नाही, तर त्याला या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळणार नाही, असे भोकनाळ याचे वकील वैभव गायकवाड यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाला सांगितले. बुधवारी या याचिकेच्या सुनावणीत भोकनाळ याच्या पत्नीने तिची बाजू मांडण्याकरिता शुक्रवारपर्यंत न्यायालयाकडून मुदत मागितली आणि न्यायालयाने ती मान्य केली. भोकनाळ याची पत्नी नाशिक पोलीस दलात हवालदार आहे, तर तो भारतीय लष्करात सेवेस आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप केल्याने मे महिन्यात नाशिक पोलिसांनी भोकनाळ याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम ४९८ (ए) आणि ४२० अंतर्गत गुन्हा नोंदविला.