Join us  

मुंबई विद्यापीठाची नुसतं 'तारीख पे तारीख'  -  अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 8:03 PM

सध्या सुरु असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

ठळक मुद्देकुलगुरूपदी नियुक्ती कशी झाली?कुलगुरुपदासाठी पात्र होते का? कुलगुरू होण्यासाठी आवश्यक पात्रता होती का?

मुंबई, दि. 16 - सध्या सुरु असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी प्रशासनाकडून होत असलेला विलंब पाहता विद्यापीठाच्या कारभारावर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. यावर अशोक चव्हाण यांनी संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होण्यासाठी आवश्यक पात्रता होती का, असा सवाल करत त्यांना तात्काळ पदावरुन हटविले पाहिजे, असे म्हटले आहे.

याचबरोबर, संजय देशमुख यांची कुलगुरूपदी नियुक्ती कशी झाली? ते कुलगुरुपदासाठी पात्र होते का? असे प्रश्नचिन्ह उपस्थित करत यासंदर्भात चौकशी झाली पाहीजे. तसेच, विद्यापीठाच्या या कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य वेठीस धरले आहे. विद्यापीठ काम म्हणजे फक्त तारीख पे तारीख असेच सुरु आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.   

काही लोक दलबदलू असतात...कॉंग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नगरसेकांबद्दल बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, काही लोक दलबदलू असतात, सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे काँग्रेसमधून उद्या कोणी बाहेर पडल्यास नव्यांना संधी मिळेल.  

बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी...मराठा आरक्षण ते बैलगाडा शर्यतींच्याबाबतीत न्यायालयात आपली बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडत आहे. तामिळनाडूमध्ये जलीकट्टूला परवानगी मिळू शकते, तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल करत याकडे सरकारने  बारकाईने लक्ष दिले पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

रोहित वेमुलावर अन्याय झाला...हैदराबाद युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येबाबत न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात वेगळीच माहिती समोर आली आहे. रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली होती, तसेच तो दलितही नव्हता, अशी माहिती न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून आली आहे. यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, रोहित वेमुला या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्याला न्याय देण्याऐवजी इतरांना वाचविले जात आहे. याप्रकरणात अनेक भाजपाचे मंत्री गुंतलेले असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे.