Join us  

विद्यापीठाच्या ७६ परीक्षांच्या तारखेत तर २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 6:53 PM

लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसेच २९ व ३० एप्रिल २०१९ या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसेच २९ व ३० एप्रिल २०१९ या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीचे दोन्ही टप्पे मिळून एकूण ७६ परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या असून २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे.

यानुसार वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ३०, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या १७, तर आंतरविद्या शाखेच्या २९ परीक्षा अशा एकूण ७६ परीक्षा वरील ५ दिवसाच्या तारखांदरम्यान सुरु होणार होत्या. त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या असून, या परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

तसेच लोकसभा निवडणुकीमुळे २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. यातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या ४, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ५ व आंतरविद्या शाखेच्या १८ परीक्षा असून या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. म्हणजेच या परीक्षा निवडणुकीपुर्वी सुरु होत आहेत. यातील काही पेपर हे निवडणुकीच्या तारखे दरम्यान येत असल्याने तेवढ्याच पेपरचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलेले आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (हॉल तिकीट) देखील दर्शविण्यात येईल.

 

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान येत असलेल्या काही परीक्षांच्या तारखा व काही परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहेत. बदललेल्या परीक्षा या निवडणुकीनंतर लावण्यात आलेल्या आहेत. कमीत कमी बदल करण्याचा विद्यापीठाने प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनी या बदललेल्या तारखांची व वेळापत्रकांची नोंद घ्यावी.-डॉ विनोद पाटील , संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ.

टॅग्स :मुंबई विद्यापीठपरीक्षा