Join us
Daily Top 2Weekly Top 5

दासगुप्ता याची रवानगी जे.जे.मधून थेट तळोजा कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:06 IST

टीआरपी घोटाळा : कारागृह प्रशासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बार्कचे माजी सीईओ ...

टीआरपी घोटाळा : कारागृह प्रशासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता याला जे.जे. रुग्णालयातून तळोजा कारागृहात हलविण्याच्या कारागृह प्रशासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

न्या. पी.डी. नाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता दासगुप्ता याच्या अर्जावर सुनावणी घेतली. मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी जे.जे. रुग्णालयाने दिलेल्या डिस्चार्ज नोटनुसार तळोजा कारागृहातील डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील.

दोनच दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने दासगुप्ता याचा जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयाला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले तसेच या अर्जावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत दासगुप्ता याने आपली अंतरिम जामीन सुनावणी करण्याची विनंती न्यायालयाला केली. अन्यथा हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात यावे, अशी विनंती अर्जाद्वारे केली आहे.

दासगुप्ता याची तब्येत ठीक नसतानाही त्याला तळोजा कारागृहात हलविण्यात येत आहे. त्यामुळे तातडीने अर्ज केल्याचे दासगुप्ता याचे वकील अर्जुन सिंह ठाकूर याने न्यायालयाला सांगितले.

त्यावर ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले की, दासगुप्ता याची तब्येत ठीक असल्याने त्याला जे.जे.तून तळोजा कारागृहात नेण्यात येत आहे. प्रक्रियेनुसार तिथेही त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि जर दासगुप्ता याची तब्येत ठीक नसल्याचे आढळले, तर तेथील वैद्यकीय अधिकारी त्याची रवानगी पुन्हा जे.जे. रुग्णालयात करतील.

सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनंतर न्यायालयाने कारागृह प्रशासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले.

दरम्यान, न्यायालयाने दासगुप्ता संबंधी जे.जे. रुग्णालय व तळोजा कारागृह डॉक्टरांचे सर्व कागदपत्रे सोमवारी सादर करण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले.