Join us

दासभक्तांनी केला जंजिरा चकाचक

By admin | Updated: April 7, 2015 22:37 IST

लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुरुडच्या प्रसिध्द जलदुर्गाची अभूतपूर्व अशी स्वच्छता मोहीम मंगळवारी परिसरातील श्री सदस्यांनी केली

नांदगाव : लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुरुडच्या प्रसिध्द जलदुर्गाची अभूतपूर्व अशी स्वच्छता मोहीम मंगळवारी परिसरातील श्री सदस्यांनी केली. या मोहिमेत सुमारे ४०० दासभक्त सहभागी झाले होते.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जंजिऱ्या किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी दासभक्तांनी सकाळीच बोटीने जंजिरा किल्ल्यात जाऊन जंजिऱ्याच्या साफसफाईला सुरुवात केली. जंजिऱ्याला दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशी - विदेशी पर्यटक भेट देत असतात. शासकीय पातळीवरून जंजिऱ्याची साफसफाई होत असली तरी ती बऱ्याच अंशी कमी पडते, असे चित्र किल्ल्याच्या आतील परिस्थितीवरून दिसून येते. जंजिऱ्यात प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा खच, तलावातील शेवाळ, खुरटी किंवा उपद्रवी झाडे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. जुने अवशेष व वास्तू देखील भग्न झाल्या असून यातून सर्वच ठिकाणी अस्वच्छता पसरली होती. इतिहासात जंजिरा अपराजित मानला जातो. या किल्ल्याला २२ बुरुज असून तटबंदी अभेद्य आहे. इ.स. १५०२ पासून १९४७ पर्यंत सुमारे ३५० वर्षे २० सिद्दींनी राज्य केले. जंजिऱ्याचे आतील सौंदर्य अबाधित राहावे यासाठी मुरुडच्या श्री सदस्यांनी खास करून जंजिरा स्वच्छतेची मोहीम प्रभावीपणे हाती घेतली. सागरी किल्ल्याच्या अशा स्वच्छतेची नवी नोंद भावी पिढीला नेहमीच प्रेरणादायी ठरेल. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत किल्ला चकाचक करण्यात आलाच, शिवाय आजूबाजूचा परिसरही सुशोभित करण्यात आला. यावेळी ऐतिहासिक वास्तूचे जतन केल्यास, इतिहास तेवत राहतो हेच दासभक्तांच्या या मोहिमेने दाखवून दिले.