Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुलाबा, फोर्टमधील मेट्रोच्या कामांमुळे महापालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना डेंग्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 03:18 IST

एकूण २३ रूग्ण, मेट्रो रेल कॉर्पोरेशनला नोटीस : पावसाळी अधिवेशनात घेणार काळजी

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गिकेवरील विधानभवन या प्रस्तावित मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती करणाºया डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. कुलाबा, फोर्ट परिसरामध्ये २३ रुग्ण आढळले आहेत़ रुग्णांमध्ये महापालिकेचे १२ कर्मचारी आहेत़ त्याची गंभीर दखल घेऊन पालिकेने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) नोटीस पाठवली आहे़ तसेच येत्या काही दिवसांत पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे़ या परिसरात लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ वाढेल़ डासांमुळे त्यांच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे़

पालिकेने पावसाळापूर्व सर्वेक्षण सुरू केले असून कर्मचारी विविध भागांमध्ये जाऊन पाहणी करत आहेत. यामध्ये महापालिकेचा आरोग्य विभाग व कीटकनाशक विभागाला बांधकाम सुरू असलेले विधानभवन मेट्रो स्टेशन, महिला विकास मंडळ कार्यालय, जनरल जगन्नाथ भोसले रोड, मंत्रालय परिसर, कफ परेड पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस, मुंबई उच्च न्यायालय परिसर, विधानभवनाचा परिसर येथे डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. पालिकेने या प्रकरणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली असून त्यांना योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.फवारणी वाढवलीकुलाबा, फोर्ट या परिसरात मेट्रो-३ मार्गिकेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होऊन त्यामध्ये डेंग्यू, मलेरियाचा प्रसार करणाºया डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभाग व कीटकनाशक विभागाला आढळून आले आहे. लवकरच पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या कालावधीमध्ये या परिसरातील वर्दळही वाढणार असल्याने साथीच्या रोगांचा धोकाही वाढू शकतो. यासाठी पालिकेनेया परिसरात धूर फवारणीवाढवली आहे. 

टॅग्स :मुंबई