जयेश शिरसाट, मुुंबईमुंबईतल्या अंडरवर्ल्डसह गुन्हेगारी आणि शस्त्रतस्करी मोडून काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईला जोरदार यश मिळाले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेसह मुंबई पोलिसांनी शहरातून तब्बल २५७ अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर, पिस्तूल) आणि तब्बल ७१५ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. या कारवाईच्या निमित्ताने मुंबईच्या वांद्रे ते दहिसर पसरलेल्या पश्चिम उपनगरांमध्ये शस्त्रतस्करी, खरेदी-विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसारखी राज्ये किंवा दिल्लीसारख्या शहरांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, लूटमारीत रिव्हॉल्वर, पिस्तूल किंवा रायफल अशा घातक शस्त्रांचा अधिकाधिक वापर होताना दिसून येतो. मुंबईतही ९०च्या दशकात अंडरवर्ल्ड ऐन भरात असताना एके ४७, उझी अशा अद्ययावत मशिन गनसह स्टार, सिक्सर अशा रिव्हॉल्व्हर, पिस्तूल या शस्त्रांच्या साहाय्याने दरदिवशी गँगवॉर घडत होते. तूर्त ही परिस्थिती बदलली असली तरी मुंबईत परराज्यांमधून होणारी शस्त्रतस्करी कमी झालेली नाही. गावठी कट्ट्यांपासून ‘मॉडीफाइड’ पिस्तूलपर्यंतची सर्व शस्त्रे मुंबईत येत आहेत. अंडरवर्ल्डपेक्षा ही शस्त्रे दरोडेखोर, वाटमारे किंवा सूडबुद्धीने पेटलेल्यांच्या हाती पडत आहेत. या शस्त्रांच्या मदतीने गंभीर गुन्हे घडू शकतात, या शक्यतेने मुंबई पोलिसांनी शस्त्रतस्करांभोवती फास आवळण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. हीच मोहीम राबवताना गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग व मोटार वाहनचोरीविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी निर्माते अली मोरानी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या तसेच दिग्दर्शक महेश भट यांच्या हत्येची तयारी करणाऱ्या गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या १४ गुंडांना गजाआड केले. तसेच त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही हस्तगत केला. या पथकांना सुरुवातीला शस्त्रसाठ्याची माहिती मिळाली होती. अटक आरोपींच्या चौकशीतून हे दोन गंभीर गुन्हे उघड झाले. मुंबईत या वर्षी अवैध शस्त्र बाळगणे, तस्करी करणे याविरोधात २१२ गुन्हे नोंदवून २५४ शस्त्रे, ७१५ काडतुसे हस्तगत केली. तसेच २९७ आरोपींना गजाआड केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कारवाई जवळपास दुप्पट आहे. या वर्षी सर्वाधिक कारवाया पश्चिम उपनगरांत झाल्या. येथे शस्त्रांचे ७० गुन्हे नोंद झाले. त्यात ८४ जणांना अटक झाली तर ६४ शस्त्रे हस्तगत केली गेली.
शस्त्रतस्करांना दणका
By admin | Updated: December 1, 2014 00:16 IST