डहाणू : पावसाने जोर पकडल्यानंतर पावसाळी आजारांनाही ग्रामीणसह खेडय़ोपाडय़ा भोवतीचा विळखा घट्ट केला आहे. डहाणू तालुक्याच्या जंगलपट्टी तसेच बंदरपट्टी भागात आधीच तापाची साथ असताना टायफॉईड, गॅस्ट्रो नेही गेल्या दहा पंधरा दिवसांपासून हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे डहाणूच्या खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात ताप आणि गॅस्ट्रोचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळत आहेत.
डहाणूच्या कासा, गंजाड, आंबेसरी, जामशेत, सायवन, आगर, नरपड, धा. डहाणू इ. गावात तसेच दुर्गम भागात गेल्या एक महिन्यापासून ताप, टायफाईड या आजाराने नागरीक त्रस्त आहेत.
त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने जलजन्य साथीच्या उद्रेकामुळे ग्रामस्थ आणखीनच हवालदिल झाले आहेत. हगवण, कावीळ, विषमज्वर, अतिसार, गॅस्ट्रो या आजाराचा जलजन्य आजारामध्ये समावेश होतो. दुषीत अन्न, पाणी तसेच उघडय़ावरचे पदार्थ खाणो, यातुन हे आजार उद्भवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणो आहे. पावसाळ्याच्या दिवसात असे आजार पसरण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे रस्त्यावरील उघडय़ावरचे अन्न खाऊ नये, उकळून पाणी प्यावे आदी काही सुचना आरोग्य विभागाकडून वेळोवेळी दिल्या जातात. परंतु या सुचनेकडे नागरीक दुर्लक्ष करीत असल्याने डहाणू तालुक्यात जलजन्य साथीचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत आहे.
दरम्यान डहाणूच्या किनारपट्टीवरील गावात सध्या ताप आणि टायफाईडच्या आजाराने गोर-गरीब रुग्ण बेजार असून कासा तसेच जंगलपट्टी भागात शेकडो रुग्णाना गॅस्ट्रोच्या साथीने पछाडले आहेत. दुषीत पाण्याप्रमाणो पावसाळ्याच्या दिवसात या परिसरात मिळणारी कंदमुळे, ताडफळे, सडकीफळे, शिळे अन्न, मासे, खेकडे, सुके म्हावरे, जंगलातील काही विशिष्ट प्रकारच्या भाजीपाला सेवन केल्यामुळे रोगाची लागण झाल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. (वार्ताहर)