म्हसळा : श्रीवर्धन मार्गावरील नवेनगर येथे धोकादायक वडाचे झाड शनिवारी रात्री नऊचा सुमारास रस्त्यावर व बाजूला असलेल्या घरांवर पडले. सुदैवाने यावेळी घरांच्या बाजूला कोणीच नसल्याने तसेच रस्त्यावर वाहन नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र वीजवाहिन्या तुटल्या असून वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. येथे काही काळ वाहतूक विस्कळीत होती. झाड कोसळून तीन ते चार तास उलटले तरी बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी हजर नव्हते. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपाययोजना करणारी यंत्रणा येथील प्रशासनाकडे नसल्याने रात्री उशिरानंतर हे झाड रस्त्याचा बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.या परिसरात रस्त्याच्याकडेला अनेक मोठी वडाची झाडे आहेत. या अगोदर सुध्दा त्याच ठिकाणी वडाचे झाड कोसळले होते. रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादायक झाडे तोडण्यात यावी, असा ग्रामसभेत ठराव घेऊन त्याची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आणि वेळोवेळी उपसभापती नाजीम हसवारे, शिवसेना तालुका प्रमुख समीर बनकर, स्थानिक नागरिक यांनी लेखी स्वरुपात सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले. परंतु बांधकाम विभागाने या सर्वाकडे दुर्लक्ष केले. या परिसरात झाड कोसळून मोठा अपघात झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का? असा प्रश्न म्हसळा शहरातील नागरिक विचारत आहेत. (वार्ताहर)
धोकादायक वडाचे झाड कोसळले
By admin | Updated: July 6, 2015 02:10 IST