पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर - उमरोळी रेल्वे स्टेशनदरम्यानच्या कोळगाव डेअरी येथील रेल्वे फाटक रेल्वे प्रशासनाने १५ वर्षांपासून बंद केल्याने वंकास पाड्यातील ६०० कुटुंबांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विद्यार्थी, महिलांना धोकादायक अवस्थेत रेल्वे मार्ग पार करावा लागत असून दोन गर्भवती महिलांनाही आपल्या गर्भाला मुकावे लागले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नाकडे ‘अच्छे दिनो का वादा करणारे’ खा. चिंतामण वनगा यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.पालघर - बोईसर रस्त्यावरील कोळगावजवळील वंकास पाडा हा आदिवासी बहुल भाग असून सुमारे एक हजार ते बाराशे लोक या भागात रहातात. या पाड्यातील विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक, महिला वर्गाला बाजारहाट शाळा -महाविद्यालयीन शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगारासाठी मुख्य पालघर - बोईसर रस्त्यावर सुमारे दोन किलोमीटर खाचखळगे व रात्री - अपरात्री अंधारातून पोहचावे लागते. त्यांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी रेल्वे गेट क्र. ४७ अे/सी मार्गाशिवाय अन्य पर्याय नाही. सन १९३५ सालापासून अव्याहतपणे सुरु असलेला हा मार्ग रेल्वे प्रशासनाने १३ एप्रिल २००९ सालापासून कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहराशी या पाड्याचा असलेला थेट संपर्कच तुटल्याने या पाड्यातील गरीब आदिवासी, समाजापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या भागात आता अन्य रस्ता नसल्याने रात्री अपरात्री एखादा रुग्ण गंभीर आजारी पडल्यास, सर्पदंश झाल्यास, संसर्गजन्य आजाराची साथ आल्यास, गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी जाण्यास भर काळोखातून दोन किलोमीटर चालत जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास
By admin | Updated: August 13, 2014 01:20 IST