तळोजा : मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललेला आहे. आधी अपघातांची भीती आणि आता त्यात चोरीच्या घटनांनी भर घातल्याने या घटनांवर अंकुश लावणे कठीण बनत चालले आहे. कळंबोली मॅकडोनाल्ड हॉटेल समोरील एक्स्प्रेसवेच्या प्रवेशव्दारावर राजरोजपणे नियमाचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक केली जात आहे. या ठिकाणी बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे फलक लावूनही अतिरिक्त प्रवाशांची सर्रास ने - आण केली जात आहे. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक शाखेला याची कानोकान खबर नसल्यामुळे हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. या प्रवासादरम्यान वाहन लुटण्याचे प्रकारही वाढल्याचे समोर आले आहे. कळंबोली मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील एक्स्प्रेसवे येथून काल शनिवारी एका इनोव्हा कारला चार अज्ञात प्रवाशांनी हात दाखवून पुण्याबाजूकडे नेण्यास सांगितले. खोपोलीनजीकच्या भागात आल्यावर या चालकाला त्यांनी लघुशंकेसाठी वाहन रस्त्याच्या कडेला लावण्यास सांगितले आणि उतरताच चालकाला धमकी देवून रोख रकमेसह सदर वाहन घेवून चोरटे पसार झाले. चालकाला काही अंतरावर नेवून त्यांनी उतरवले. या गुन्हयाची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक मुटकुळे करत आहेत. या मार्गावरील अशा घटना दिवसेंदिवस घडत असून पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प आहे. यासंदर्भात परिमंडळ - २ चे सहा. वाहतूक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)
एक्स्प्रेस-वेवर धोकादायक प्रवास
By admin | Updated: November 30, 2014 22:31 IST