ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. २० - दादर पश्चिमेकडील फूलमार्केट परिसरातील अहमद उमर या इमारतीला आज पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली असली तरी या दुर्दैवी घटनेत २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
फूलमार्केटजवळील सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या या रहिवासी इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर रूममध्ये आगीची ठिणगी पडली आणि काही मिनिटांतच संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. अग्निशमन दलाच्या १६ हून अधिक गाड्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आग विझवण्यासोबतच इमारतीत अडकलेल्या अनेक कुटुंबियांना त्यांनी सुखरूपरित्या बाहेर काढले.
दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.