कसारा : एकीकडे अवकाळी पावसाने जनावरांचा चारा हिरावून घेत शेतीचे नुकसान केलेच, परंतु १५ दिवसांपासून कसाऱ्याजवळील चिंध्याचीवाडी या अतिदुर्गम आदिवासी पाड्यात गाय, बैल या जनावरांना विचित्र रोगाची लागण झाल्याने येथील ४० ते ४५ जनावरे दगावली असून १५ ते २० जनावरांना रोगाची लागण झाली आहे.आदिवासी पाडा असलेल्या चिंध्याचीवाडी भागातील ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. अवकाळी पावसाच्या संकटातून बाहेर पडत नाही तोच जनावरांना विचित्र रोगाची लागण झाल्याने ४० हून अधिक जनावरे दगावली आहेत. या भागात पशुवैद्यकीय अधिकारी येत नसल्याने जनावरांना लस मिळू शकली नाही व रोगाचे निदान होऊ शकले नाही. ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खराटे यांना संपर्क केल्यावर पशु दवाखान्यातील शिपाई सांगरे यांना पाठविण्यात येत होते. त्यामुळे मूळ उपचार व रोगाचे निदान होत नसल्याने जनावरे तडफडून मरण पावत आहेत. चिंध्याचीवाडी येथील पदू गोपाळ पाठेकर या शेतकऱ्याचे गाय, बैल अशी एकूण १४ जनावरे दगावली आहेत. सक्रू सोमा धुपारे, बबन धुपारे, पदू धुपारे, काळू भला, बारकू वीर, नंदू गावंड, भगवान भला या शेतकऱ्यांची प्रत्येकी ३ ते ४ जनावरे दगावली आहेत. या विचित्र रोगाच्या साथीमुळे जनावरे तडफडून मरत असल्याची माहिती शहापूर पंचायत समितीच्या व जिल्हा परिषद ठाणेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना असतानाही शासनस्तरावर पिडीतांना एक रुपयाही मदत न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
चिंध्याचीवाडीत विचित्र रोगाने ४० पशू दगावले
By admin | Updated: March 30, 2015 23:40 IST