डहाणू : झपाट्याने विकसित होत असलेल्या पालघर जिल्ह्णातील डहाणू तालुक्याच्या शहरी तसेच खेड्यापाड्यांत महिनाभरापासून सातत्याने डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून गेल्या आठ दिवसांत डेंग्यूचे १५ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले आहेत. डहाणू, वापी, पारडी तसेच बलसाडच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, एवढे रुग्ण आढळूनही जिल्हा आरोग्य विभागाने डेंग्यूचा मुकाबला करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. परिसरात डेंग्यूचा फैलाव वाढतच असून ग्रामस्थांमध्ये भीती आहे.डहाणूत गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूचा रुग्णांची संख्या वाढतच जात असल्याचे येथील खाजगी डॉक्टरांचे म्हणणे असून डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात धनंजय जीवू गोवारी (तलासरी), गणेश माच्छी (धूमकेत), तेजस चुरी (वासगाव) हे उपचार घेत आहेत. तर गेल्या महिन्यात सेवा नर्सिंग होममध्ये डेंग्यूच्या एकूण आठ संशयित रुग्णांना औषधोपचाराद्वारे बरे करण्यात आले होते. सध्या तेथे अमोल तळगे (कोसबाड), रंजना भुरकूड (डोंगरपाडा) या डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर डॉ. देव हॉस्पिटलमध्ये निमेश नरेश आगरी (चिखला), शिवाय डॉ. अशोक कांबळे यांच्या रुग्णालयात आॅक्टोबरमध्ये डेंग्यूचे आठ पेशंट दाखल झाले. तीन-चार दिवसांत येथे हरिदास (डहाणू), मिमिश कोरे (वाढवण), प्रफुल्ल रोंदळ (डहाणू) हे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतीत डहाणूचे तालुका आरोग्य अधिकारी सागर पाटील यांना विचारले असता डेंग्यूचे रुग्ण आहेत. परंतु, त्यांच्या विविध टेस्ट केल्यानंतरच निश्चित काय ते समजेल, असे ते म्हणाले. तसेच येत्या दोन दिवसांत जनजागृतीसाठी कासा येथे शिबिर ठेवल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
डहाणूत डेंग्यूचा धुमाकूळ
By admin | Updated: November 7, 2014 23:33 IST