Join us

मुंबईतील मॉलची सुरक्षा व्यवस्था धोक्यात

By admin | Updated: August 12, 2015 04:00 IST

आजवर मुंबई अनेक घातपाती कारवायांना सामोरी गेली. बॉम्बस्फोट, दंगली, गोळीबार असे हल्ले शहरामध्ये झालेले आहेत. प्रत्येक हल्ल्यानंतर त्यावर चर्चा होते. सुरक्षेचे कवच आणखी अभेद्य करण्याचे

टीम लोकमत : मुंबई, आजवर मुंबई अनेक घातपाती कारवायांना सामोरी गेली. बॉम्बस्फोट, दंगली, गोळीबार असे हल्ले शहरामध्ये झालेले आहेत. प्रत्येक हल्ल्यानंतर त्यावर चर्चा होते. सुरक्षेचे कवच आणखी अभेद्य करण्याचे आश्वासन मिळते. नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला मिळतो, मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थेच राहते. मुंबईतील रेल्वे स्थानके तसेच लोकल डब्यांमध्येही स्फोटक वस्तू किंवा आक्षेपार्ह वस्तू नेल्या जाऊ शकतात हे ‘लोकमत’ने आधी केलेल्या स्टिंगमुळे उघड झाले होतेच. आता मुंबईतील मॉलही सुरक्षित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.चाकू का? या प्रश्नावर खून करायला..! हे उत्तर ऐकूनही सुरक्षारक्षकाने एकही प्रतिप्रश्न न करता, अगदी हसत हसत मॉलमध्ये प्रवेश दिला गेला. हा प्रसंग मालाड, लिंक रोडवरील इनआॅर्बिट या प्रशस्त मॉलमध्ये घडला आहे. या एका प्रसंगावरून शहरातल्या एकूण मॉलमधील सुरक्षा कशी असेल? सुरक्षारक्षक किती सतर्क असतील? मुंबई दहशतवाद्यांच्या रडारवर आहे ही जाणीव त्यांना आहे का? या प्रश्नांची उत्तरे झटक्यात मिळतात. ‘लोकमत’ने केलेल्या मेगा स्टिंग आॅपरेशनमधून शहरातले मॉल आकार, स्टेटसने मोठे असले तरी त्यातली सुरक्षा अत्यंत पोकळ आहे, ही गंभीर बाब समोर आली.‘लोकमत’चे दोन प्रतिनिधी मालाडच्या इनआॅर्बिट मॉलमध्ये मुख्य प्रवेशद्वाराने शिरले. एका प्रतिनिधीकडील कापडी पिशवीत चाकू होता. तो स्कॅनर मशिनमध्ये दिसला. सुरक्षारक्षकाने चाकू कशासाठी? असे विचारलेही. त्यावर एका प्रतिनिधीने माझ्या लहान मुलांना फळे कापून देण्यासाठी लागतो, असे उत्तर दिले. तर सोबतच्या दुसऱ्या प्रतिनिधीने ‘कशाला म्हणजे? खून करायला’, असे थेट सांगितले. ते ऐकून सुरक्षारक्षक प्रतिप्रश्न करेल, ही बाब आपल्या वरिष्ठांना कळवेल, पोलिसांना बोलावून घेईल, चौकशी होईल, असा अंदाज ‘लोकमत’ प्रतिनिधींनी मनोमन बांधला होता. पण असे काहीच घडले नाही. उलट सुरक्षारक्षकाने हसून एकही प्रतिप्रश्न न करता, चाकूसारखे घातक हत्यार जप्त न करता ‘लोकमत’ प्रतिनिधीला त्याने आत सोडले. शहरातील नागरिक तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांची मॉल्समध्ये नेहमीच भरपूर वर्दळ असते, मात्र त्याच्या सुरक्षेबाबत कोणीच गंभीर नाही असे या स्टिंगवरून दिसून आले.इन्फिनिटी मालाड पश्चिम, वेळ : दुपारी १.२७ ‘लोकमत’च्या दोन टीम मुख्य प्रवेशद्वाराने व तळघरातील पार्किंग लॉटमधून मॉलमध्ये शिरल्या. एका टीमकडे कापडी पिशवीत दडवलेला सुरा होता. तर दुसऱ्या टीमकडील सॅकमध्ये डबे होते. दोन्ही टीमकडील सामान स्कॅनर मशिनमधून स्कॅन होऊन आले. मात्र मशिनवर नेमणूक असलेल्या सुरक्षारक्षकाला या सामानात संशयास्पद असे काहीच जाणवले नाही. हा ‘लोकमत’ टीमसाठीही आश्चर्याचा धक्का होता. नक्षत्र ठिकाण : दादर, वेळ : दुपारी १.४५ कापडी पिशवीत दोन मोठ्या कात्री घेऊन ‘लोकमत’ टीम मॉलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचली. उपस्थित दोन सुरक्षारक्षकांनी प्रतिनिधींची अंगझडती घेतली. हातातील पिशवीवरूनही मेटल डिटेक्टर फिरवले. मात्र मेटल डिटेक्टरने कोणताही संकेत दिला नाही. सुरक्षारक्षकांनीही टीमला मॉलमध्ये जाण्याची परवानगी दिली. मॉलच्या गेटवर तर सुरक्षा व्यवस्थाच नव्हती. फिनिक्सठिकाण - कुर्ला प, वेळ - दुपारी १.३५मुख्य प्रवेशद्वारातून ‘लोकमत’च्या छायाचित्रकाराने प्रवेश केला तेव्हा सुरक्षारक्षकांमध्ये वाद सुरू होता. आधी माझी बॅग तपासा, अशी विनंती करताच सुरक्षारक्षकांनी छायाचित्रकारासोबत हुज्जत घातली.छायाचित्रकाराने आत प्रवेश केला आणि छायाचित्रीकरण सुरू केले. तेव्हा वरिष्ठांनी हस्तक्षेप करत छायाचित्रकाराला कॅमेऱ्यातील फोटो डिलीट करण्यास सांगितले. रात्री दहापर्यंत बॅग घेऊन गेलात तरी चालेल, असे सांगितले. फिनिक्सठिकाण - लोअर परळ, वेळ - दु. १२.१२दोन ‘टॉयगन’, मटण चॉपर, कोयता, लांब सुऱ्या, मोठी कात्री अशी सात ते आठ हत्यारे-अवजारे सॅकमध्ये भरून ‘लोकमत’ टीम पॅलेडियमकडील गेटने आत शिरली. प्रवेशद्वारावर तपासणी झाली. तेव्हा टॉयगनबाबत रक्षकांनी प्रश्न केले. मात्र घातक हत्यारे असलेली सॅक एकही प्रश्न न विचारता आत सोडली. के स्टार, ठिकाण - चेंबूर, वेळ - स. ११.३०येथील सुरक्षारक्षकांनी प्रतिनिधीची सॅक संपूर्ण उघडून तपासली. त्यात डबे आढळले. डब्यात जेवण आहे का? या प्रश्नावर हो... हे उत्तर ऐकून टीमला आत सोडले. या रक्षकांकडे हॅण्ड मेटल डिटेक्टरही होते. लोकमत प्रतिनिधीने तुम्ही डिटेक्टर का नाही वापरत, बिघडलाय का, असा प्रश्न केला. तेव्हा डिटेक्टरचे चार्जिंग उतरले आहे, असे उत्तर मिळाले. इनआॅर्बिट, मालाड प., वेळ : दुपारी २.१७ इनआॅर्बिट मॉलमध्ये ‘लोकमत’ची दुसरी टीम बेसमेंटमधल्या पार्किंग लॉटमधून आत शिरली. टीममधील सदस्यांकङ्मे डबा असलेली सॅक होती एकाने अंगझडती घेतली, तर दुसऱ्याने सॅक तपासली. सॅकचा पहिलाच कप्पा तपासून त्याने जा...असे हाताने खुणावले. प्रत्यक्षात सॅकला चार कप्पे होते. शेवटच्या कप्प्यात डबा होता. मेटल डिटेक्टर असूनही त्याचा वापर झाला नाही. ड्रीम्स, भांडुप प., वेळ - सकाळी ११.४८ मॉलच्या गेट नंबर तीनमधून ‘लोकमत’ टीमने प्रवेश केला. सुरक्षारक्षकांनी प्रतिनिधींची तपासणी केली. शिवाय प्रतिनिधींकडील बॅगही तपासल्या. मात्र बॅगेतील चाकू सुरक्षारक्षकांना दिसला नाही. अन्य प्रतिनिधीच्या शर्टच्या खिशात ‘कटर’ होते. ते उघड्या डोळ्यांनी दिसत होते. मात्र त्याला हटकले नाही. पार्किंग लॉटमध्ये एकही सुरक्षारक्षक नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था होती. सिटी सेंटर ,मुंबई सेंट्रल, वेळ - स. ११.३०बॅगेवरून मेटल डिटेक्टर फिरवूनही आतील हत्यारांचा सुगावा सुरक्षारक्षकांना लागला नाही. पुढे रक्षकांनी हीच बॅग हातानेही चाचपून पाहिली. तेव्हाही रिझल्ट सेम. दुसऱ्या प्रतिनिधीने दोन ‘टॉयगन’सह मॉलमध्ये प्रवेश केला. महिला सुरक्षारक्षकाने या प्रतिनिधीची बॅग तपासून टॉयगन पॅकबंद का नाहीत, खुल्या कशा, असा सवाल केला. तेव्हा या नव्या नाहीत किंवा इथून विकत घेतलेल्याही नाहीत. घरच्या आहेत, असे उत्तर प्रतिनिधीने दिले. प्रतिप्रश्न करण्याऐवजी प्रतिनिधीला आत सोडले. स्टार ,ठिकाण - दादर, वेळ - दु. २.०५ एका कापडी पिशवीत कागदात गुंडाळलेल्या दोन कात्री घेऊन ‘लोकमत’ प्रतिनिधीने आत प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक होते. त्यांच्याकडे डोअर-हॅण्ड मेटल डिटेक्टर, स्कॅनर मशिन होते. मात्र ‘लोकमत’ प्रतिनिधीने ती पिशवी स्कॅनिंग मशिनमध्ये न टाकताच डोअर मेटल डिटेक्टरमधून आत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर हॅण्ड मेटल डिटेक्टर असलेल्या सुरक्षारक्षकाने झडती घेतली. मात्र पिशवीची तपासणी सोडाच पण साधी विचारपूसही झाली नाही. आर सिटीघाटकोपर प., वेळ - दुपारी १२.५०प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांची गर्दी पाहून येथे नक्कीच हटकले जाईल, असा अंदाज होता. एका प्रतिनिधीच्या शर्टच्या खिशात ‘कटर’ होता. मात्र तपासणीवेळी सुरक्षारक्षकांनी त्याकडे कानाडोळा केला. अन्य प्रतिनिधीच्या बॅगमध्ये चाकू होता. स्कॅनिंगनंतरही महिला सुरक्षारक्षकाकडून बॅगेची झाडाझडती होईल, अशी अपेक्षा होती. तीही झाली नाही. विशेष म्हणजे ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे पार्कसाइट पोलीस ठाण्यात मॉलविरुद्ध हल्लीच गुन्हा नोंदवला होता. परिस्थिती जैसे थेच आहे.ओबेरॉयगोरेगाव पूर्व, वेळ : दुपारी ३.१५ ‘लोकमत’ टीमने चाकू दडवलेली बॅग सोबत घेऊन आत शिरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथल्या सुरक्षारक्षकाने बॅग स्कॅनिंग मशिनमध्ये ठेवण्यास सांगितले. बॅग स्कॅनिंग मशिनमध्ये फसली. तेव्हा सुरक्षारक्षकाने प्रतिनिधींना अडवले. तपासणीत बॅगेतून चाकू सापडला. हा चाकू तुमच्याकडे ठेवून घेणार का? या प्रश्नावर रक्षकाने नकार दिला. एका रजिस्टरमध्ये नाव आणि मोबाइल नंबर लिहून त्याने चाकूसह मॉलमध्ये बिनदिक्कतपणे प्रवेश दिला. सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी स्कॅनिंग मशिन नसल्याने हत्यारे आणि शस्त्रे घेऊन जाणे सोपे.स्कॅनिंग मशिन असूनही सामानातील संशयास्पद वस्तू न आढळणे.हॅण्ड मेटल डिटेक्टरचा योग्य वापर न करणे, डिटेक्टर असताना फक्त हाताने तपासणी करून अंदाज घेणे.मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची झाडाझडती न घेणे. तपासणीसाठीची आवश्यक असलेली उपकरणे नसणे. बेसमेंटमधील मॉलच्या एन्ट्री पॉइंटवर बंदोबस्तातील ढिलाईआम्ही अनेकदा पोलिसांनाच पकडलेकुर्ल्याचा फिनिक्स, घाटकोपरचा आर. सिटी या मॉलविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्ही जास्त सतर्क झालो. सुरक्षारक्षकांची संख्या वाढवली. सुरक्षेसाठी तीन टप्पे केले. या घटनांनंतर हल्ली अनेकदा पोलीसच वेश बदलून येतात. सुरक्षा वाढवल्याने १५ ते १६ वेळा आम्ही पोलिसांनाच पकडले, अशी माहिती चेंबूरच्या के स्टार मॉलमधील सुरक्षारक्षकाने ‘लोकमत’ला दिली.------------सहभागी प्रतिनिधी जयेश शिरसाट, सचिन लुंगसे, अमर मोहिते, सुशांत मोरे, तेजस वाघमारे, स्नेहा मोरे, चेतन ननावरे, समीर कर्णुक, मनीषा म्हात्रे, गौरी टेंबकर-कलगुटकरसर्व छायाचित्रे दत्ता खेडेकर, ओमकार कोचरेकर, विजय बाटे