Join us

महामार्गावरील वनसंपदा धोक्यात

By admin | Updated: April 27, 2015 22:32 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला जाहिरातदारांनी विळखा घातला असून जाहिरातबाजीच्या नावाखाली पर्यावरणाची अपरिमित हानी करण्यासाठी कंबर कसली जात आहे.

अमोल पाटील ञ खालापूरमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला जाहिरातदारांनी विळखा घातला असून जाहिरातबाजीच्या नावाखाली पर्यावरणाची अपरिमित हानी करण्यासाठी कंबर कसली जात आहे. महामार्गावरील वाहतुकीचा फायदा घेण्यासाठी महामार्गालगतच्या खाजगी जागेवर जाहिरात फलक उभारून प्रवाशांना आकर्षित करतानाच अडथळा ठरणाऱ्या वनसंपदेची खुलेआम कत्तल हे जाहिरातदार करीत आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा एक्स्प्रेस वेवरील वृक्षतोडीचा मुद्दा चव्हाट्यावर आला असताना या प्रश्नांवर थेट राज्यपालांनीच निर्देश देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किलोमीटर - ३१च्या दरम्यान पुण्याकडील बाजूला आंबा, साग, सुबाभूळ, जांभूळ, खैर, उंबर, पिंपळ आदी दुर्मीळ वृक्षांची बेसुमार कत्तल केल्याप्रकरणी पर्यावरणप्रेमींनी महामार्ग प्रशासन, वन विभाग, महामार्ग पोलीस, महसूल प्रशासन यांच्या नुकतेच निदर्शनास आणून दिले. किलोमीटर ९ ते १0 च्या दरम्यान आरिवली गावाच्या हद्दीत मुंबईकडील मार्गावर अशाच वृक्षांची तोड केल्याचे समोर आले आहे. या दरम्यान नव्याने जाहिरात फलकाची उभारणी करण्याचे काम जवळच्याच खाजगी जागेवर युद्धपातळीवर सुरु आहे. एक्स्प्रेस वे च्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या डेल्टा फोर्सच्या कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असल्याची चर्चा आहे.एक्स्प्रेस वेवर कोणतेही गैरप्रकार करण्याची हिंमत माहितीगाराशिवाय कोणीच करू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत तक्र ारदारांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभाग, पोलीस, वन विभाग, खालापूर महसूल प्रशासनाला जागे केले असूनही ठोस कारवाई न केल्याने वृक्षतोडीचे काम सुरूच आहे.आयआरबीची भूमिका : ३0 किलोमीटर अंतरासाठी १ पेट्रोलिंग वाहन व दर ५ किलोमीटर अंतरासाठी डेल्टा फोर्सचा एक कर्मचारी गस्तीचे काम करीत असतो. रात्री अंधाराचा फायदा घेवून व गस्तीचा अभ्यास करून यांत्रिक पद्धतीने टप्प्याटप्प्याने वृक्षतोड केली जात आहे. कंपन्यांची पॉलिसी : एक्स्प्रेस वेवर काही किलोमीटर अंतरावरून दृष्टिपथात येणाऱ्या खाजगी जागांची निवड करणे व जागा ताब्यात घेणे. जाहिरात फलक उभारणीच्या पूर्वीच काही महिने वृक्षांची तोड करणे. वृक्षतोडीमध्ये एक्स्प्रेस प्रशासनास हाताशी धरणे. जाहिरातदारांचे फंडे : स्थानिक ग्रामपंचायतीमधील काही सदस्यांना आमिष दाखवून त्याचप्रमाणे ना हरकत दाखल प्राप्त करून कमीत कमी कर आकारणी करून घेणे. वन जमिनींवर फलक उभारताना वन अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करणे. राजकीय कार्यकर्त्यांची मदत घेणे. पालवीही खुडली : किलोमीटर ३१ व १0 येथे कत्तल केलेल्या वृक्षांना वसंत ऋ तूत फुटलेली पालवी खुडून टाकण्याचे किळसवाणे प्रकार येथे सुरूच आहे. पुन्हा वृक्षांनी जीव धरू नये म्हणून राहण्यासाठी वृक्षांना आगी लावण्याचे प्रकार केले आहेत. पर्यावरणप्रेमी व पत्रकारांनी केलेल्या तक्र ारींची साधी दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त होत असताना राज्यपालांच्या दरबारी कैफियत मांडण्याशिवाय पर्याय उरला नसल्याची स्पष्टोक्ती दिली जात आहे.