Join us  

पूर्व उपनगरात नाल्यांवरील झाकणे उघडी असल्याने धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 1:13 AM

यंदाही पावसाळा सुरू होऊनही पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी मॅनहोल व नाल्यांवरील झाकणे उघडीच आहेत.

मुंबई : पावसाळा सुरू होताच नागरिक नाल्यांमध्ये किंवा मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होण्याच्या घटना दरवर्षी घडतात. अनेकांना या दुर्घटनांमध्ये आपला जीवही गमवावा लागतो. यंदाही पावसाळा सुरू होऊनही पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी मॅनहोल व नाल्यांवरील झाकणे उघडीच आहेत.अनेक ठिकाणी पदपथांवर तर काही ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यावरच नाल्यांवरील झाकणे उघडी आहेत. यामुळे येत्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याच्या घटना घडल्यास या उघड्या मॅनहोल व नाल्यांमध्ये अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुंबई महानगरपालिकेने अजूनही या उघड्या नाल्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन शहरातील रस्त्यांवरून चालावे लागत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पालिकेची पावसाळ्यापूर्वीची अनेक कामे रखडली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नाले तुंबणे, झाडे कोसळणे तसेच रस्त्यांवर खड्डे पडणे यांसारख्या घटना घडण्यास सुरुवात झाली आहे. पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी मॅनहोल व नाल्यांवरील झाकणे पूर्णत: गायब आहेत, तर काही ठिकाणी ती तुटलेल्या अवस्थेत आहेत. भविष्यात हे उघडे नाले व मॅनहोल निरपराध मुंबईकरांच्या जीवावर बेतू शकतात. म्हणूनच उघड्या नाल्यावरील झाकणे पालिकेने बसवावीत अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.