Join us
Daily Top 2Weekly Top 5

दांडियालाही विमा अन् सुरक्षाकवच!

By admin | Updated: September 24, 2014 03:04 IST

गणेशोत्सवानंतर गेल्या काही वर्षांपासून नवरात्रीतही मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येतो. इव्हेंट स्वरूपात साजरा होणारा हा उत्सव आता गल्लीबोळामध्येही तेवढ्याच थाटामाटात साजरा केला जातो

मुंबई : गणेशोत्सवानंतर गेल्या काही वर्षांपासून नवरात्रीतही मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येतो. इव्हेंट स्वरूपात साजरा होणारा हा उत्सव आता गल्लीबोळामध्येही तेवढ्याच थाटामाटात साजरा केला जातो आहे. त्यामुळे आता गणेशोत्सव मंडळांप्रमाणे बड्या आयोजकांनी दांडियालाही विमा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कवच चढविण्याचा निश्चय केला आहे. जेणेकरून उत्सवाचा बेरंग होऊ नये याकरिता हे दक्षतेचे पाऊल उचलले आहे.गणेशोत्सवाप्रमाणे मुंबई पोलिसांची नवरात्रौत्सव आणि दांडियावरही नजर आहे. नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी महिलांचा सहभाग विशेष असतो. रात्रीच्या वेळेत महिलांची छेड काढण्याची शक्यताही अधिक असते. मात्र यंदा काही मंडळांनीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पुढाकार घेतला आहे. यंदाचा नवरात्रौत्सव हा वेगळा ठरणार आहे. या वर्षी नवरात्रीमध्ये महिला फक्त गरबा खेळण्यासाठी सहभागी होणार नसून महिलांचे रक्षण करण्यासाठीच महिलाच पुढाकार घेणार आहेत. याप्रमाणेच घाटकोपर येथे नायडू क्लब आयोजित दांडियाचाही सहा करोड रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. यात इव्हेंट स्थळासोबतच बाहेरील आवाराचा सहभाग त्यात असणार आहे. शिवाय, प्रत्येक व्यक्तीच्या विम्याचा समावेश असून संपूर्ण उत्सवाचाही विमा काढण्यात आला आहे. या उत्सवात २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून एका मुख्य कॅमेऱ्याचे इनपुट्स जवळील पोलीस ठाण्याला देण्यात येतील, असे आयोजक गणेश नायडू यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हृतिक रोशन, कॅटरीना कैफ, मिका सिंग असे बडे सेलीब्रिटीज या ठिकाणी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)