Join us

दांडी बहाद्दर, कामचुकारांना यंदा सानुग्रह अनुदान नाही!

By admin | Updated: October 23, 2014 23:40 IST

कामचुकार तसेच दांडी बहाद्दर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर यंदा सानुग्रह अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

ठाणे : कामचुकार तसेच दांडी बहाद्दर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर यंदा सानुग्रह अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाची परवानगी न घेता दीर्घकाळ रजेवर आणि विभागनिहाय चौकशीच्या फेऱ्यात सापडलेल्या अधिकाऱ्यांवर ही वेळ आली आहे. आयुक्त असीम गुप्ता यांनी तसा फतवाच काढल्याने सानुग्रह अनुदानाकडे आस लावून बसलेल्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. दिवाळीची धामधूम सुरु असतांना आजही पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हाती सानुग्रह अनुदान पडलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी - कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ६, ५०० रुपये असे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचा आकडा बराच मोठा आहे. प्रशासनाने नेमून दिलेल्या कामात हयगय केल्याबाबत चौकशी ओढावून घेणारे कामचुकार कर्मचारी गेली अनेक वर्षे सानुग्रह अनुदानाचा फायदा घेत आहेत. परंतु, यामुळे पालिकेच्या तिजोरीवर विनाकारण आर्थिक भार पडत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच आयुक्तांनी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना यंदा या अनुदानापासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार नसल्याचे परिपत्रकच त्यांनी काढले आहे. (प्रतिनिधी)