Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठप्प वाळू व्यवसायामुळे उपासमार!

By admin | Updated: June 20, 2015 23:42 IST

गेली अनेक वर्षे दासगाव खाडीपट्ट्यातील वाळू व्यवसाय ठप्प असल्याने या व्यवसायावर निर्भर असलेल्या ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आली आहे.

दासगाव : गेली अनेक वर्षे दासगाव खाडीपट्ट्यातील वाळू व्यवसाय ठप्प असल्याने या व्यवसायावर निर्भर असलेल्या ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आली आहे. वाळू व्यवसाय ठप्प असल्याने विविध शासकीय तसेच खाजगी बांधकाम प्र्रकल्पांकरिता लागणारी वाळू मिळेनाशी झाल्याने हे प्रकल्प खंडित झाले आहेत.महाड तालुक्यात वाळूबंदी केल्याने गेली अनेक महिने हा व्यवसाय ठप्प आहे. विविध कारणांमुळे हा व्यवसाय बदनाम झाला असल्याने वारंवार होणाऱ्या कारवायांना वाळू व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे तर वाळू व्यावसायिक देखील अतिरेक करत असल्याने या कारवाया करणे प्रशासनाला भाग पडत आहे. अशा विविध कारणांनी वाळू व्यवसाय वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने बांधकाम व्यवसायाकरिता लागणारी वाळू मिळायची बंद झाली आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिक देखील हवालदिल झाले आहेत. शिवाय विविध शासकीय प्रकल्प देखील रखडले आहेत. महाड शहरातील विविध खाजगी बांधकाम प्रकल्प ठप्प झाल्याने या व्यवसायाशी निगडित कामगार तसेच मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.दासगाव खाडीपट्ट्यात महाड एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे सावित्री नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे या विभागातील ग्रामस्थांचे शेती तसेच मासेमारी व्यवसाय धोक्यात आल्यानंतर अनेकांनी वाळू व्यवसायात पदार्पण केले. मात्र या ना त्या कारणाने कायम वादात सापडलेल्या या व्यवसायामुळे वाळू व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. वाळू व्यवसायामुळे या परिसरातील अनेक तरुणांना, महिलांना रोजगार उपलब्ध झाला. होडी चालवणे, वाळूची ने -आण करणे तसेच वाळू किनाऱ्यावर उतरणे अशा विविध प्रकारचा रोजगार तरुण व महिलांना उपलब्ध झाला होता. गेली अनेक दिवसांपासून वाळू व्यवसाय ठप्प झाल्याने हा रोजगार देखील ठप्प झाला आहे. यामुळे या परिसरातील दासगाव, टोळ, वीर, वहूर, केंबुर्ली, सर्व गोठे, दाभोळ, आंबेक, कोकरे, चिंभावे, जुई, कुंबळे, तुडील, गोमेंडी, वराठी आदी गावातील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने बंदी उठवल्यास कामगारांना पुन्हा रोजगार मिळेल. (वार्ताहर)कर्ज फेडायचे कसे?-या परिसरातील अनेकांनी कर्ज काढून होड्या तसेच वाळूची ने-आण करण्याकरिता लागणारी वाहने घेतली आणि हा व्यवसाय बंद झाला. यामुळे कर्ज कसे फेडायचे अशी चिंता देखील या कर्जदारांना लागली आहे. -या परिसरातील शेती, मासेमारी व्यवसाय प्रदूषणामुळे नष्ट झाल्याने आधीच येथील स्थानिक ग्रामस्थ नरकयातना भोगत असतानाच पर्याय म्हणून पुढे आलेल्या वाळू व्यवसायावर देखील प्रशासनाने कारवाई केल्याने आता या ग्रामस्थांना जगायचे कसे असा प्रश्न सतावत आहे. -शासनाने खंडित बांधकाम प्रकल्प, बेरोजगारी आदींबाबत सकारात्मक विचार करून वाळू व्यवयाय सुरू करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.