मोहोपाडा : देवळोली येथील शेतकऱ्यांनी उसरण धरणासाठी १९८५ मध्ये आपली कसती जमीन अत्यंत नगण्य भावात म्हणजे ५000 रूपये प्रति एकरी दरात पाटबंधारे विभागाला दिली. यावेळी दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यात दुसरीकडे जमीन देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना मिळाले. यात गावातील १५ ते १६ शेतकऱ्यांची अंदाजे २६ एकर जमीन पाटबंधारे विभागाने घेवून उसरण धरण बांधले, मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या आजतागायत पूर्ण झालेल्या नाहीत. या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोवर उसरण धरणाचे पाणी इतर भागांसाठी उचलू देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.२६ जानेवारी २0१४ रोजी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत उसरण धरणाचे पाणी देण्यासाठी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला देवू नये असे ठरले होते, परंतु ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची दिशाभूल करीत देवळोली - उसरण धरणातून गुळसुंदे योजनेकरिता जागा व पाणी उचलण्यास व लाइन टाकण्यास शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत देवळोली ग्रामपंचायतीकडून १ मे २0१४ रोजी नाहरकत दाखला दिला गेला होता. सदर बाब शेतकरी व ग्रामस्थांना समजताच ते संतापले. त्यांनी ग्रामसभा जमवून सरपंच व ग्रामसेवकांना धारेवर धरून ग्रामसभा गाजवली. हा प्रकार पाहताच देवळोली ग्रामपंचायतीने बदलाचा ठराव घेऊन उसरण धरणातून पाणी उचलण्यास व लाइन टाकण्यास दिलेली परवानगी रद्द करून तसे पत्रक शेतकऱ्यांना देण्यात आले. यावेळी या सभेत देवळोलीतील शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यशिवाय धरणातील पाणी इतर भागात न देण्याचा निर्णय शेतकरी व ग्रामस्थ वर्गाने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीतर तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे उमेश पाटील, उदय झिंगे, गजानन बढवी यांनी सांगितले. (वार्ताहर)
धरणाचे पाणी अडवणार!
By admin | Updated: November 30, 2014 22:36 IST