कर्जत : तालुक्याचा रेल्वे पट्टा हिरवागार करण्यासाठी पाली, भुतिवली धरण बांधण्याचा संकल्प पाटबंधारे विभागाने केला होता, मात्र धरणातून पाणी शेतीसाठी ज्याद्वारे दिले जाणार आहे ते कालवे पूर्ण होण्यास आणखी काही वर्षे लागण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने धरणाच्या पाण्याखाली आलेली एक हजार हेक्टर जमीन यावर्षीतरी ओलिताखाली येण्याची चिन्हे नाहीत. पाली-भुतिवली लघुपाटबंधारे प्रकल्प आराखडा तयार होताना शेतीसाठी धरण हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यात मुख्य कालवा तसेच डावा आणि उजव्या कालव्याचा अंतर्भाव करण्यात आला होता. त्या कालव्यामधून पाणी परिसरातील गावातील शेतीला दिले जाणार असल्याने रेल्वे पट्टा हिरवागार होणार असा विचार या भागातील शेतकरीवर्गात होता, मात्र तीस वर्षे लोटली तरी हा परिसर हिरवागार झाला नाही. आणखी काही वर्षात तरी सावरगावच्या टोकापर्यंत पाणी पोहचण्याची शक्यता नाही. धरणाचे पाणी डाव्या कालव्याने आसल, भुतिवली, आसलपाडा, बेकरे, माणगाव, आंबिवली, एकसल या गावांना दिले जाणार होते. उजव्या कालव्यातून चिंचवली, उक्रुल, गारपोली, डिक्सल, उमरोली, वावे, आषाणे, कोशाणे, सावरगाव या गावातील शेतीसाठी जाणार होते, परंतु धरणाच्या जलाशयात दहा वर्षापूर्वी पाणी साठा होवून कोणत्याही कालव्यात थेंबभर पाणीही पडले नसल्याने धरणाच्या जलाशयामधे पाणी भरल्यानंतर त्यानंतरच्या उन्हाळी हंगामात एकूण शेतीपैकी पस्तीस टक्के शेती ओलिताखाली येणे गरजेचे होते. शेतकरी याने त्रस्त आहेत,मात्र धरणाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना धरणातील पाणी साठ्याबाबत काहीही चिंता नाही, अशा अधिकारी वर्गावर कारवाईची मागणी होत आहे.
धरणाचे पाणी यंदाही शेतीला नाही
By admin | Updated: December 16, 2014 22:34 IST