Join us

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ कायम; यंत्रणांसमोर चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST

दिवसभरात काेराेनाचे १ हजार ९२२ नवे बाधित; रुग्ण दुपटीचा कालावधी १५६लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत मंगळवारी १ ...

दिवसभरात काेराेनाचे १ हजार ९२२ नवे बाधित; रुग्ण दुपटीचा कालावधी १५६

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत मंगळवारी १ हजार ९२२ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ४७ हजार ५८१ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ११ हजार ५३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी १५६ दिवस इतका आहे.

मुंबईत मंगळवारी दिवसभरात १ हजार २३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत ३ लाख १९ हजार ८७८ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १५ हजार २६३ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. ९ ते १५ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.४५ टक्के असल्याची नोंद आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३४ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर २४६ इमारतींत रुग्ण आढळून आल्याने त्या सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३५ लाख ९३ हजार ६५ चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

* ‘या’ १३ विभागांत झपाट्याने वाढला संसर्ग

गेल्या आठवडाभरात महापालिकेच्या २४ विभागांपैकी १३ विभागांत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मुंबईत रुग्णवाढीचे सरासरी प्रमाण ०.४२ टक्के आहे. पालिकेच्या अंधेरी पश्चिम, मुलुंड, चेंबूर, वांद्रे, माटुंगा, मानखुर्द, गोवंडी, गोरेगाव, कुर्ला, अंधेरी पूर्व, घाटकोपर, कांदिवली, भांडुप, खार या १३ विभागांत सरासरी रुग्णवाढीच्या दरापेक्षा अधिक प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. रुग्णवाढीचे सर्वाधिक प्रमाण के पश्चिम, अंधेरी, जोगेश्वरी या विभागात ०.६२ टक्के, तर टी विभागात ०.५८ टक्के इतके आहे.

* पश्चिम उपनगर ठरले संसर्गाचे केंद्र

मुंबईत ७ ते १४ मार्च या आठवडाभरात रुग्णवाढीचा कालावधी सरासरी ०.४२ टक्के इतका आहे. त्यापैकी अंधेरी पश्चिम येथील के वेस्ट ०.६२ टक्के, मुलुंड टी विभागात ०.५८ टक्के, चेंबूर एम वेस्ट विभागात ०.५७ टक्के, वांद्रे एच वेस्ट विभागात ०.५३ टक्के, माटुंगा एफ नॉर्थ विभागात ०.५८ टक्के, मानखुर्द-गोवंडी एम ईस्ट विभागात ०.५० टक्के, गोरेगाव पी साऊथ विभागात ०.४८ टक्के, कुर्ला एल विभागात ०.४५ टक्के, अंधेरी पूर्व के ईस्ट ०.४५ टक्के, घाटकोपर एन विभागात ०.४५ टक्के, कांदिवली आर साऊथ विभागात ०.४४ टक्के, भांडुप एस विभागात ०.४३ टक्के, तर खार एच ईस्ट विभागात ०.४५ टक्के इतके रुग्णवाढीचे प्रमाण आहे.

.........................