Join us  

मुंबईत सामाजिक भान राखत दहीहंडी होणार साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 6:23 AM

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जलप्रलय आल्याने आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला असून काही आयोजकांनी दहीहंडीमधील रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबई : मुंबापुरीत यंदा सामाजिक भान राखत दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दरवर्षी हंड्या फोडण्यासाठी चुरस असते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जलप्रलय आल्याने आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला असून काही आयोजकांनी दहीहंडीमधील रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.आगामी निवडणुकीमुळे यंदाची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची योजना राजकीय नेत्यांनी केली होती. राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने सामाजिक बांधिलकी जपत राजकीय नेत्यांनी आपला दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. माजी आमदार कालिदास कोळंबकर आयोजित हंडी, अरुण दूधवडकर यांचा एसी मार्केटमध्ये होणारा उत्सव तसेच गिरगावमध्ये पांडुरंग सकपाळ यांचा गोपाळकाला यंदा रद्द केला आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजन विचारे यांनी दहीहंडी आयोजन रद्द केले आहे. आमदार राम कदम, माजी मंत्री सचिन अहिर यांच्या मोठ्या दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.पूर्व उपनगरातील शिस्तबद्ध आणि खेळाडंूनी व्यापलेल्या कांजूरमार्गच्या छत्रपती गोविंदा पथकाने गेल्या वर्षी ८ थर रचले होते. या पथकाचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. या पथकाला प्रशिक्षक रितेश भाटकर, प्रशिक्षक सुरेश दळवीयांच्याकडून सराव मिळाला आहे, असे छत्रपती गोविंदा पथकाचे प्रमुख सल्लागार महेंद्र रावले यांनीसांगितले.

राज्याबाहेरील पथकदेखील दहीहंडीसाठी उत्सुकराज्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, उरण, डहाणू, दापोली, चिपळूण, खेड, रोहा, कल्याण, पिंपरी, अलिबाग येथून गोविंदा विमा काढत आहेत. मात्र यंदा गोवा, बडोदा येथील पथकांनी विमा काढला आहे. यंदा विमा काढणारी मंडळे आणि गोविंदा यांची संख्या वाढली असल्याची माहिती दि ओरिएण्टल इंशुरन्स कंपनीचे उपप्रबंधक सचिन खानविलकर यांनी दिली.आयडियल सांस्कृतिक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सेलिब्रेटी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. ‘ध्वनिप्रदूषण व पाण्याचा गैरवापर टाळा’ हा संदेश देण्यासाठी सेलिबे्रटी उपस्थित राहणार आहेत. या वर्षी शेफ तुषार देशमुख, अभिनेत्री मधुरा वेलणकर, अभिनेत्री सुलेखा तळवलकर, अभिनेता तुषार दळवी, अभिनेत्री शिल्पा तुळसकर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :मुंबई