Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीवरून मुंबई-ठाण्यात जुंपली

By admin | Updated: September 1, 2015 03:06 IST

न्यायालय, आयोजक आणि राज्य सरकार यांच्या वादात दहीहंडी उत्सव अडकला असताना आता दहीहंडीवरून मुंबई-ठाण्यात जुंपली आहे

मुंबई : न्यायालय, आयोजक आणि राज्य सरकार यांच्या वादात दहीहंडी उत्सव अडकला असताना आता दहीहंडीवरून मुंबई-ठाण्यात जुंपली आहे. ‘मुंबई दहीहंडी समन्वय समिती’ आणि ‘ठाणे दहीहंडी समन्वय समिती’त उत्सवावरून वादाची ठिणगी पडली आहे. दहीहंडीच्या वादात आता या समित्याच आमनेसामने आल्या आहेत. आयोजकांच्या गळतीनंतर रविवारी ‘ठाणे दहीहंडी समन्वय समिती’ने उत्सवातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतर ठाण्यातील पथकेही उत्सवाकरिता मुंबईत येणार नाहीत, अशी भूमिका समितीने घेतली आहे. शिवाय, मुंबईतील गोविंदा पथकांनाही ठाण्यास येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वेळप्रसंगी ठाण्यात येणारे रस्ते अडवून गोविंदांचा मार्ग रोखण्यात येईल, असा इशारा ‘ठाणे दहीहंडी समन्वय समिती’ने दिला आहे. परिणामी, ठाण्याच्या समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे या वादाला नवे वळण मिळणार आहे.अवघ्या चार दिवसांवर उत्सव येऊन ठेपला असताना उत्सवाचा वाद चिघळत आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव साजरा होणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. राजकारणी मात्र उत्सवाचे ‘लोणी’ खाण्यात बाजी मारताना दिसत आहेत. गोविंदांना वालीच उरला नसल्याने हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. (प्रतिनिधी)