डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या वीस ते पंचवीस गावात तसेच खेडोपाड्यात बाडापोखरण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अपुरा व एकदिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांचे प्रचंड हाल होत आहे. सणासुदीच्या काळातही पाणीटंचाई भासत असल्याने महिलांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वाढवण, तनासी, ओसार, वानगांव, तारापुर, घिवली, तडियाळे, गुंगवाडा, बाडापोखरण, धा. डहाणू इ. गावात अनेक परिसरातील खेड्योपाड्याना साखरे धरणातून पाणी पुरविले जाते. परंतु १९९६ साली सुरू झालेली बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी सन २००६ ला कालबाह्ण झाल्याने तिच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव गेल्या सात आठ वर्ष धूळखात पडल्याने या भागात पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले. साखरे धरणाजवळ असलेल्या जलकुंभातून पाणी सोडल्यानंतर अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटून पाणी वाया जात आहे. त्यामुळे शेवटच्या टोकावर असलेल्या गावांना पाणी मिळत नाही. शिवाय पाणी सोडण्याची कोणतीच वेळ किंवा दिवस निश्चित नसल्याने येथील ग्रामस्थांना रात्री, बेरात्री पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान डहाणू येथे तर पुरेसा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने येथील लोकांना पंधरा दिवसापुर्वीच साठवणुक करून ठेवलेले दूषीत पाणी पिण्याची वेळ आली आहे. दरम्यान नुकतेच जुन महिन्यात बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणाचा प्रस्तावाला शासनाने मान्यता देऊन ४३ करोड रू. मंजूर केल्याने येथील हजारो ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे. परंतु बाडापोखरण योजनेच्या नूतनीकरणाचे काम कासव गतीने सुरू असल्याने हे काम के व्हा पूर्ण होणार असा संतप्त सवाल येथील गावकरी करीत आहे. (वार्ताहर)
डहाणूत दिवसाआड पाणीपुरवठा
By admin | Updated: October 11, 2014 00:12 IST