Join us

डहाणूतील २५० अतिक्रमणे तोडणार

By admin | Updated: May 31, 2014 00:36 IST

डहाणू शहरातील सागर नाका येथे दररोज प्रचंड वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने दिवसभर येथे वाहतूक ठप्प होवून अनेक लहान-मोठे अपघात होत असतात.

डहाणू : सिंहस्थ कुंभमेळ्याकडे जाणार्‍या राज्य मार्गावरील सागर नाका परिसरातील पथ किनार्‍यावरील अनेक अतिक्रमणावर डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी हातोडा चालवून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केल्याने येथील नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. डहाणू शहरातील सागर नाका येथे दररोज प्रचंड वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने दिवसभर येथे वाहतूक ठप्प होवून अनेक लहान-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे डहाणू नगर परिषदेने शासनाच्या विविध योजनेंतर्गत येथील जनता बँक चौक परिसराचे रुंदीकरण व सुशोभीकरणाचे विकासकाम चालू केले आहे. या विकासकामाअंतर्गत शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या पश्चिमेपासून सागर बिल्डिंगपर्यंत दोन्ही बाजूने वीस मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जात आहे. शिवाय भुयारी गटार योजनेच्या विकासकामांनीही वेग घेतला असून रस्त्याच्या पूर्वेकडील भागाचे काम हाती घ्यायचे असल्याने येथील वर्षानुवर्षांपासून असलेले अतिक्रमण हटवणे गरजेचे बनले आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सी. जे. संख्ये यांनी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटिसा देवूनही टाळाटाळ करीत असल्याने मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी पोलीस बंदोबस्तात सागर बिल्डिंगमधील गाळे व या बिल्डिंगच्या बाहेर आलेल्या पत्र्याच्या शेड, ओटे तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या महालक्ष्मी प्लाझा या इमारतीची संरक्षक भिंत, भंगार दुकान जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. यावेळी बांधकाम अभियंता तुकाराम बारी, पोलीस निरीक्षक नागेश जाधव उपस्थित होते. दरम्यान, सर्वांना समान न्याय, कुणाचे जास्त पाडणार व कुणाचे कमी पाडणार, अशी भूमिका न घेता शहरातील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने तोडणार असल्याचे मुख्याधिकारी पिंपळे यांनी यावेळी सांगितले. परिसरात सध्या वेगाने अतिक्रमणे होत असून याबाबत नोटिसा देऊनही त्यात वाढच होत असल्याची तक्रार आहे. (वार्ताहर)