शौकत शेख, डहाणूयेथील वानगांव, डहाणू, घोलवड, कासा, पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या किनारपट्टीवरील सागरी चौक्यात पोलीस नसल्याने येथील सागरी सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे येथील ठाण्यात पोलीसांचे संख्याबळ कमी असल्याने या कोस्टल चेकपोस्ट ओस पडल्या आहेत. मुुंबई शहराला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याला विशाल समुद्रकिनारा लाभलेला आहे. १९९२ साली बॉम्ब स्फोटात वापरलेले आरडीएक्स मुंब्रा येथे दडविले होते तर २६/११ चा मुंबई वर हल्ला करणारे क्रुरकर्मी अजमल कसाब आणि त्याचे साथीदार डहाणूमार्गे आले होते. त्यामुळे येथील संपूर्ण किनारपट्टी संवेदनशील आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने पाहिजे तशी उपाययोजना होत नाही. येथील सागरी सुरक्षेसाठी यापूर्वी शासनाने अनेक पोलीस चौक्या, सागरी चौक्या, तसेच तपासणीनाके उभारले परंतु पोलीसच नसल्याने त्याचा काहीच फायदा होत नाही. डहाणू तालुक्यातील वानगाव पोलीस ठाणे अंतर्गत वरोर, बाडापोखरण, वानगाव बाजार तर डहाणू पोलीस हद्दीत धा. डहाणू, चिखला, येथे गेल्या अनेक वर्षापूर्वी सागरी चेकपोस्ट बांधण्यात आले. परंतु यातील बहुतेक चौक्या गावाबाहेर असल्याने शिवाय त्यात वीज, पाणी, किंवा इतर सोयीसुविधा नसल्याने दिवसरात्र ड्युटी करणाऱ्या पोलीसांना अनेक अडचणी येतात. त्यातच अपुऱ्या मनुष्यबळावर येथील पोलीस गाडा हाकलत असल्याने समुद्रकिनारपट्टीवरील चौक्या बंद पडल्या आहेत. दरम्यान समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांमधील संभाव्य समुद्रमार्गी हल्ले व अतिरेकी कारवाया रोखणे तसेच नागरीकांना सतर्कतेचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते त्यानंतर मात्र वर्षभर येथील सागरी सुरक्षा रामभरोसे असते.
डहाणूची सागरी सुरक्षा वा-यावर
By admin | Updated: February 8, 2015 23:01 IST