आज पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार असून सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात आली आहे. या दरम्यान शांततेचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवतरे यांनी वाणगाव, डहाणू, घोलवड, कासा, पोलीसांना दिले आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात जिल्हापरिषदेच्या बारा तर पंचायत समितीच्या चोरीस जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी येथील विविध पक्षाचे १५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावित आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला प्रचार थंडावला असून गावागावातून, खेड्यापाड्यात विविध पक्षाचे झेंडे, फलक उमेदवारांचे चिन्ह काढण्यात आले आहे.डहाणू तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हापरिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षातर्फे जोरदार प्रचार करण्यात आला असला तरी काही किरकोळ प्रकार वगळता कुठेही मोठी अप्रिय घटनेची नोंद नाही. आज होणाऱ्या मतदानाच्या दिवसीही शांतपणे मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी डहाणू तालुक्यात ५५० पोलीस, २५ पोलीस अधिकारी तसेच १ उपविभागीय पोलीस अधिकारी ठेवण्यात आले आहे. डहाणू तालुक्यात ३७७ मतदानकेंद्रे असून त्यासाठी २५०० अधिकारी व कर्मचारी मतदान पार पाडणर आहेत. विविध गावात मतदानाचे साहित्य, पोलीस, तसेच कर्मचाऱ्यांना घेवून जाण्यासाठी ४७ लक्झरी बसेस, टेम्पो, तर ४७ मॅजिक गाड्या इ. वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत.डहाणू तालुक्यात सर्वत्र शांतपणे मतदान व्हावे कुठेही गैरप्रकार होऊ नये यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी उमेश बिरारी तसेच सहाय्यक निवडणुक अधिकारी प्रितीलता कौंरथी तर उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवतरे प्रत्येक मतदान केंद्राला भेटी देणार आहेत.
डहाणूत ५५० पोलीस, २५ अधिकारी १ डीवायएसपी
By admin | Updated: January 27, 2015 23:00 IST