Join us

दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विमानतळाच्या धर्तीवर प्रतीक्षालय उभारण्यात आले आहे. आता दादर, लोकमान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विमानतळाच्या धर्तीवर प्रतीक्षालय उभारण्यात आले आहे. आता दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही सर्व सुविधायुक्त प्रतीक्षालय उभारले जाणार आहे. त्यामुळे दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. सहा महिन्यानंतर ही प्रतीक्षालये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या प्रतीक्षालयाच्या सुविधेसाठी प्रवाशांना शुल्क मोजावे लागणार आहे.

सध्या मध्य रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असलेले प्रतीक्षालय, विश्रामकक्षात सुविधांची कमतरता आहे, तर त्यांचे दरही काहीसे जास्त आहेत. याशिवाय ते टर्मिनसवरील फलाटांपासून दूरच आहेत. त्यामुळे टर्मिनसवर सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्त्वावर नव्या प्रतीक्षालयाची उभारणी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार सर्व सुविधांनी युक्त असे प्रतीक्षालय सीएसएमटीत मेल-एक्स्प्रेसच्या १४ ते १८ नंबर फलाटाच्या प्रवेशद्वाराजवळच उभारण्यात आले आहे. आता एलटीटी स्थानकात प्रतीक्षालय उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली असून, दादर स्थानकातील कामासाठीही लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात नव्या प्रतीक्षालयाच्या उभारणीसाठी ऑगस्ट महिना उजाडेल आणि त्यानंतर काही महिन्यांतच हे प्रतीक्षालय प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, असे सांगण्यात आले.

* असे असणार प्रतीक्षालय

सीएसएमटीप्रमाणे या प्रतीक्षालयातही सोफा, डायनिंग टेबल, प्रसाधनगृह, क्लॉक रूम, लायब्ररी, लॅपटॉपसह बसण्याची व्यवस्था, चार्जिंग पॉईंट, खानपान सेवा, पर्यटन साधने यासह अन्य सुविधा उपलब्ध असतील. मुंबई विमानतळावर प्रवाशांना आगमन व निर्गमन विमानांची माहिती मिळावी, यासाठी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या प्रतीक्षालयातही याचप्रकारची सुविधा असेल. प्रवाशांना मेल-एक्स्प्रेस गाड्यांची माहिती मिळावी म्हणून एलसीडी स्क्रिन बसविण्यात येतील तसेच प्रवाशांना गाड्यांची माहिती मिळावी, यासाठी तेथे उद्घोषणा यंत्रणाही बसविण्यात येणार आहे.