Join us  

दादर 'हिरकणी' (एशियाड) बस स्थानकाचे उद्घाटन संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 6:44 PM

अत्याधुनिक  आकर्षक बसस्थानकाचे उद्घाटन मा. मंत्री, परिवहन व खारभूमी विकास तथा एस. टी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांच्या शुभहस्ते व महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, रणजित सिंह देओल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

मुंबई : दादर येथे दादर-पुणे स्टेशन मार्गावर थांबणाऱ्या हिरकणी (एशियाड) बसेसचे प्रवाशांसाठी  उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक  आकर्षक बसस्थानकाचे उद्घाटन मा. मंत्री, परिवहन व खारभूमी विकास तथा एस. टी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांच्या शुभहस्ते व महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, रणजित सिंह देओल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या कार्यक्रमाला स्थनिक खासदार राहुल शेवाळे, माजी महापौर श्रद्धा जाधव, स्थानिक नगरसेवक अमय घोले व ऊर्मिला पांचाळ यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना रावते म्हणाले की, या बस थांब्याच्या धर्तीवर मुंबईतील दादर पश्चिम, सायन (शीव),मैत्री पार्क, स्वस्तिक पार्क व एवराट नगर(चुनाभट्टी) येथील बस थांबे लवकरच बांधण्यात येतील. तसेच महाराष्ट्रातील सुमारे 4 हजार 500 मार्गस्थ निवा-यापैकी 1 हजार मार्गस्थ निवारे याप्रमाणे अत्याधुनिक करण्यात येतील.१४ एप्रिल १९८३ साली सुरू केलेल्या दादर-पुणे निमआराम (एशियाड) बस सेवेसाठी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर छोटेखानी प्रवासी  प्रतीक्षालय उभारण्यात आले होते. दिवसेंदिवस प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे तेथे नव्याने अत्याधुनिक बसस्थानक बांधणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार, प्रशस्त प्रतिक्षालय, आकर्षक रंगसंगती, ग्रॅनाईट फ्लोअरिंग, चालक-वाहक विश्रांतीगृह, संगणकीकृत आरक्षण कक्ष, प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा अशा विविध सोयी-सुविधांसह १००७१० चौरस फूट आकाराचे सुसज्ज बसस्थानक उभारण्यात आले. हे बसस्थानक उभारण्यासाठी ५१ लाख ४५ हजार २३३ रुपये इतका खर्च आला आहे. हे बसस्थानक आजपासून दादर-पुणे स्टेशन मार्गावर हिरकणी (एशियाड) बसने प्रवास  करणाऱ्या प्रवाशांच्या वापरासाठी खुले होत आहे.