हुसेन मेमन, जव्हारजव्हार तालुक्यातील पर्यटनासाठी एकमेव असलेला निसर्गरम्य दाबोसा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षित करीत आहे. शनिवार व रविवार अशा सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने या दाबोसा धबधब्यावर विकेंडसाठी शेकडो पर्यटकांची गर्दी करीत आहेत. जव्हार तालुक्यातील दाबोसा धबधबा हा निसर्गरम्य धबधबा असून हा धबधबा जव्हार शहरापासून अवघ्या १७ किलोमीटर दूर गुजरात सेलवास रस्त्यावर वडोली या गावानजीक आहे. हा धबधबा या सततच्या पावसाने फेसाळताना दिसत आहे. तर कडे-कपारीतून मोह व फेसाळणारे झरे हिरवेगार डोंगर टेकड्या अशा पार्श्वभूमीवर हा धबधबा कोसळतो आहे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक थक्क होतात. तर खाली खोल दरीत उतरून डोंगर, टेकड्यांचा आणि जंगलाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत तालुक्यातील निसर्गरम्य दाबोसा धबधब्यावर गुजरात, दादरा नगरहवेली, सेलवास, नाशिक, ठाणे, पालघर, डहाणू, वाडा, भिवंडी या भागातून शेकडो पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत. खोलदरीत जाऊन आल्यावर गरमागरम वडापाव, भाजलेले भुट्टे मिळतात. तर निसर्गरम्य धबधब्यासमोरील जंगलातल्या हॉटेलमध्ये भोजन व राहण्याची सोय केली आहे. वाहने उभी करण्यासठी पार्र्किंगची सोय आहे. खोलदरीत उतरण्यासाठी दगडांच्या पायऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निसर्गरम्य दाभोसा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
दाबोसा धबधब्यावर तरुणाईला उधाण
By admin | Updated: June 29, 2015 23:17 IST