Join us  

दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरण तपासावर उच्च न्यायालय नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 5:39 AM

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करीत असलेल्या एसआयटीने तपास अहवाल सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने नाराजी दर्शविली.

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करीत असलेल्या एसआयटीने तपास अहवाल सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने नाराजी दर्शविली. तपास यंत्रणेच्या तपासावर आम्ही नाखूश आहोत, असे उच्च न्यायालयाने सोमवारच्या सुनावणीत म्हटले. तपासादरम्यान आरोपींना पकडण्यासाठी एसआयटीने काही स्वतंत्र पावले उचलली नाहीत. त्यामुळे काही नीट घडतच नाही, असे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. जी. एस. पटेल यांच्या खंडपीठाने म्हटले.दाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी विनंती दाभोलकर, पानसरे यांच्या कुुटुंबीयांनी याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होती. या सुनावणीत एसआयटीतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी खंडपीठापुढे तपास अहवाल सादर केला.कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे गेला दीड महिना हा तपास पुढे सरकू शकला नाही, असे मुंदर्गी यांनी न्यायालयाला सांगितले. ‘कोल्हापूरमध्ये पूर आल्याने अधिकारी काहीही तपास करू शकले नाहीत, याच कारणास्तव आम्ही कोणताही कठोेर आदेश देणार नाही,’ असे न्यायालयाने म्हटले.मात्र, एसआयटी अन्य तपासयंत्रणांच्या तपासावर अवलंबून असल्याचा शेरा उच्च न्यायालयाने मारला. ‘तपास अधिकाऱ्यांनी तपास करण्यासाठी काय स्वतंत्र पावले उचलली, याबाबत नमूद केलेले नाही. जे काही तुम्ही अहवालात नमूद केले आहे, तो तपास अन्य केसेसमध्ये (दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्याप्रकरण) अन्य तपासयंत्रणांनी केलेला आहे. आम्ही याबाबत नाखूश आहोत, हे व्यक्त करायलाच हवे. केवळ कोल्हापूरमधील पूरस्थिती विचारात घेऊन आम्ही कठोर आदेश देण्यापासून स्वत:ला अडवत आहोत. पुढील सुनावणीत एसआयटी सर्वसमावेशक तपास अहवाल सादर करेल, अशी आशा बाळगतो,’ असे न्यायालयाने म्हटले.दरम्यान, दाभोलकरांची हत्या ज्या शस्त्राने करण्यात आली, ते शस्त्र ठाण्याच्या खाडीत टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने न्यायालयाला यापूर्वी दिली होती. ती शस्त्रे शोधण्यासाठी परदेशातून तज्ज्ञ बोलविण्यात आल्याचीही माहिती सीबीआयने न्यायालयाला दिली होती. ठाण्याच्या खाडीत शस्त्र शोधण्याचे काम सुरू असून आणखी चार आठवडे लागतील, असे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने चार आठवड्यांनी या याचिकेवर सुनावणी ठेवली.>न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावानरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी विनंती दाभोलकर, पानसरे यांच्या कुुटुंबीयांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयाला केली आहे.

टॅग्स :नरेंद्र दाभोलकर