Join us
Daily Top 2Weekly Top 5

गिधाड संवर्धनासाठी सायकल रॅली

By admin | Updated: February 16, 2016 11:10 IST

गिधाड पक्षी हा मृत जनावरांवार उपजिवीका करणारा आणि पर्यावरण स्वच्छ राखणारा अन्नसाखळीतील महत्वाचा दुवा आहे. सध्या गिधाडांच्या अस्तित्वाच्या फारच कमी खुणा राज्यामध्ये नोंदविल्या गेल्या आहेत.

जयंत धुळप

अलिबाग, दि. १६ - गिधाड पक्षांचे निसर्गातील अनन्यसाधारण महत्व ओळखून भारत सरकारने आणि  इतर जागतिक संस्थांनी गिधाडाच्या संवर्धनासाठी देशांतर्गत विविध प्रकल्प राबविण्याचे निर्णय घेतले. परंतु ढासळत्या गिधाडांच्या अधिवासाचा मात्र विचार व त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाहीत. 
गिधाड पक्षी हा मृत जनावरांवार उपजिवीका करणारा आणि पर्यावरण स्वच्छ राखणारा अन्नसाखळीतील महत्वाचा दुवा आहे. सध्या गिधाडांच्या  अस्तित्वाच्या फारच कमी खुणा राज्यामध्ये नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिपळूण येथील "सह्याद्री निसर्ग मित्र" तसेच महाड येथील "सह्याद्री मित्र" आणि "सिस्केप" या संस्थांच्या माध्यमातून गेल्या दशकात गिधाडांच्या वसतीस्थानांच्या नोंदींचे सर्वेक्षण केले गेले आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आले. 
आज गिधाडांच्या पिल्लांवर उपासमारीची पाळी येते आणि त्यामुळे पहिल्याच वर्षात उडालेली व मोठी झालेली ही पिल्ले भुकेपोटी खाली पडतात आणि मग अन्नाच्या शोधार्थ तिथेच फिरत बसतात. गेल्या महिन्यामध्ये महाड परिसरात असेच एक गिधाडाचे पिल्लू सव या गावी शेतकरी संघटनेच्या तरूण कार्यकर्त्यांच्या नजरेत पडले. पुढे सिस्केपच्या कार्यकर्त्या्नी तसेच महाड विभागीय वनपरिक्षेत्र कर्मचार्यांच्या सहकार्याने त्यास खाद्य देऊन मग नाणेमाची येथे ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सोडण्यात आले. 
पण प्रश्न पुढे उभा राहतो की हे एक पिल्लू हाती लागले बाकीच्या पिल्लांचे काय झाले असेल...? इतर ठिकाणी गावांमध्ये चौकशीँअंती गिधाडे उडताना बघितल्याचे व शेताच्या बांधावर बघितल्याचे नोंदी आढळल्या. मात्र संपर्काअभावी त्यांची माहिती संस्थेपर्यंत पोहचू शकली नाही,. याच शंकेचा आधार घेऊन संस्थेने महाड ते गोरेगाव लोणेरे परिसरांतर्गत असलेल्या गावांमध्ये गिधाडांच्या विषयी जनजागृती करण्याचा कार्यक्रम गिधाड संवर्धन जनजागृती अभियानातून करण्याचे ठरविले. 
 
सध्या पर्यावरणाच्या ढासळत्या स्वरूपाचा विचार करता अनेक पक्षी व प्राण्यांच्या प्रजातीवर संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. शिवाय आजमितीसही प्राण्यांची चोराटी शिकार सुरूच आहे. याचं उदाहरण म्हणजे खेड येथील गेल्या महिन्यात खवले मांजरांच्या खवल्यांच्या तस्करीचे  उदाहरण समोर येते. आणि यामध्ये तब्बत तीन पोती भरून खवल्यांचा साठा जप्त करण्यात  आला. 
अशा अऩेक अधिक धोक्यात आलेल्या प्रजातींविषयी तालुक्यामध्ये प्रशासन व सामाजिक संस्थांबरोबर चर्चा करून कोणतेही ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न दिसत नाही. पर्यायाने एकंदरीतच वन्य जीव आणि पर्यावरण यावर विपरीत परिणाम होत आहे. सिस्केप महाड, सह्याद्री मित्र महाड, म्हसळे वनखाते आणि स्थानिक पत्रकार यांच्या विद्यमाने म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथे अशा प्रकारचा "गिधाड संवर्धन प्रकल्प" गेल्या दीड दशकामध्ये यशस्वीपणे राबविला जात आहे. तेथील वाढत्या गिधाडांच्या संख्येमुळे श्रीवर्धन, म्हसळा परिसरात आजमितीस हमखास गिधाड़े आकाशात विहरताना दिसतात. 
 
 या अभियानांतर्गत महाड ते गोरेगाव लोणेरे पर्यंतच्या सर्व गावांमध्ये पर्यावरण व वन्यजीवांविषयीच्या संवर्धनाची जबाबदारी  व जनजागृती होणार आहे. शिवाय ही जनजागृती सायकलचा वापर करून करण्यात येणार आहे की जेणेकरून "सायकल वापरा  व प्रदूषण टाळा" असा संदेश लोकांपर्यंत पोहचवला जाईल. 
या अभियानंतर्गत महाड विभागीय वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक पत्रकार, महाड मधील रंगसुगंध सारख्या सामाजिक संस्था, त्यात्या गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व तरूण व महिला मंडळ सहभागी होणार आहेत.
 
 या अभियानाची सुरूवात दि. 21फेब्रुवारी 2016 रोजी  सकाळी आठ वाजता महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथून सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चवदार तळे असा मार्गक्रमण करीत दासगाव, वीर, टेमपाले, लोणेरे, गोरेगाव पोलीस ठाणे, वडघर येथील साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक येथे या अभियानाचा समारोप त्याचदिवशी सायंकाळी चार वाजता होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रेमसागर मेस्त्री 9657864290, योगेश गुरव 8888232383 यांचेशी संपर्क साधावा.